‘ह्युमन ट्रॅफिकिंग’चा नागपूर ‘हब’; दोन वर्षांत ५८० पीडितांची सुटका!

By नरेश डोंगरे | Updated: August 1, 2025 19:11 IST2025-08-01T19:10:27+5:302025-08-01T19:11:07+5:30

आरपीएफ आक्रमक : पाच वर्षांत ६४ हजार मुला-मुलींची सुटका

Nagpur is a 'hub' of 'human trafficking'; 580 victims rescued in two years! | ‘ह्युमन ट्रॅफिकिंग’चा नागपूर ‘हब’; दोन वर्षांत ५८० पीडितांची सुटका!

Nagpur is a 'hub' of 'human trafficking'; 580 victims rescued in two years!

नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
पूर्वोत्तर राज्ये आणि सीमेपलीकडच्या महिला-मुलांची मोठ्या प्रमाणात तस्करी (ह्युमन ट्रॅफिकिंग) करून त्यांना महाराष्ट्रात आणले जात आहे. यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रांतातील शहरात पाठविले जात असल्याची धक्कादायक माहिती रेल्वे सुरक्षा दला (आरपीएफ)कडून पुढे आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत बांगलादेश आणि म्यानमार, प. बंगाल, यूपी, बिहार तसेच ओडिशासह बाजूच्या प्रांतामधून महिला-मुलांची तस्करी वाढली आहे. त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून समाजकंटक ''ह्युमन ट्रॅफीकिंग'' करतात. नंतर त्यांना वेश्याव्यवसायाच्या नरकात ढकलले जाते. वेठबिगारांसारखी मजुरी आणि जबरदस्तीने भीक मागून घेतली जाते. २०२२ ते २०२४ या कालावधीत अशा प्रकारचे ५८० पीडित विविध रेल्वे स्थानकांवर पकडले गेले असून, त्यांची तस्करी करण्याच्या आरोपात ७०१ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक आकडेवारी
देशभरात रेल्वे गाड्यांमधून होणाऱ्या मानवी तस्करीचे प्रमाण प्रचंड धक्कादायक आहे. २०२० पासून आतापावेतो अशा प्रकारे पळवून नेल्या जाणाऱ्या ६४,००० मुलामुलींना विविध रेल्वे स्थानकावर आरपीएफने ताब्यात घेतले आहे. त्यात ४३, ४९३ मुले आणि २०४११ मुली आहेत.

मध्यवर्ती ठिकाण असल्याने रेल्वे गाड्यांमधून नागपूरमार्गे मोठ्या प्रमाणात ''ह्युमन तस्करी'' केली जाते. गेल्या वर्षी अशा प्रकारे ४५ मुले, ३४ मुली, २२ पुरूष आणि ३६ महिला असे एकूण १३७ जणांची आरपीएफने सुटका केली. तर, १ जानेवारी ते २९ जुलै २०२५ या सात महिन्यांच्या कालावधीत अशाच प्रकारे मानव तस्करीचे ६ प्रयत्न हाणून पाडत आरपीएफने ३४ मुले, २२ मुली, ३ पुरूष तसेच १४ महिलांची सुटका केल्याची माहिती वरिष्ठ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी ''लोकमत''ला दिली आहे.

अँटी-ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट्स
दरवर्षी हजारो मुला-मुलीचे गोड-गुलाबी स्वप्न चुरगाळून त्यांच्या भवितव्याला काळोखाच्या गर्तेत झोकून देणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईचा हंटर ओढण्यासाठी आरपीएफने कंबर कसली आहे. ''ऑपरेशन मुस्कान, ऑपरेशन आहट'' अंतर्गत नागपूरसह ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर ७५० अँटी-ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट्स स्थापन केले आहेत.

‘हॉटस्पॉट्स’, गाड्या रडारवर
आरपीएफ सूत्रांच्या मते, सिकंदराबाद, अजमेर, मुझफ्फरपूर, कटिहार आदी ठिकाणं मानवी तस्करीची ‘हॉटस्पॉट्स’ आहेत. त्यामुळे तिकडून येणाऱ्या गाड्यांवर विशेष निगराणी ठेवली जात  आहे. पीडितांच्या मदतीसाठी १०९८ आणि ११२ हे हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध असून, तक्रारीची तात्काळ दखल घेण्याचे कडक निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.
 

Web Title: Nagpur is a 'hub' of 'human trafficking'; 580 victims rescued in two years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर