नागपूर : अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदाराकडून घरमालकाला मारहाण
By योगेश पांडे | Updated: April 9, 2023 17:34 IST2023-04-09T17:34:11+5:302023-04-09T17:34:33+5:30
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नागपूर : अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदाराकडून घरमालकाला मारहाण
योगेश पांडे
नागपूर : अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदाराकडून घरमालकालाच मारहाण करण्यात आली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. खुशाल वाघ (३९, देवनगर, पिपळा) असे घरमालकाचे नाव आहे.
वाघ यांच्या घरी वरच्या मजल्याचे बांधकाम सुरू असून त्यांनी याचा ठेका संतोष गायकवाड (ढगेच्या बंगल्याजवळ, हुडकेश्वर) याला दिला होता. त्यांनी त्याला १.६५ लाखांत काम दिले. त्यांनी टप्प्याटप्प्यानी त्याला १.३५ लाख रुपये दिले व उरलेले पैसे काम पूर्ण झाल्यावर देण्याचे आश्वासन दिले. मात्र दोन दिवस गायकवाडने कामच बंद ठेवले. वाघ यांनी याबाबत विचारणा केली असता गायकवाडने अगोदर उरलेले पैसे द्या, मगच काम सुरू करतो असा पवित्रा घेतला. त्याने अरेरावीची भाषा वापरल्याने वाघ यांनी त्याला बांबू व इतर साहित्य घेऊन जाण्यास सांगितले. यावरून तो संतापला व त्याने वाघ यांच्या दुकानात जाऊन वाद घातला.
त्यानंतर दोघेही घरी गेले असता तेथे परत वाद झाला व गायकवाडने वाघ यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने बांधकामाच्या विटादेखील वाघ यांना फेकून मारल्या व त्यातील एक वीट वाघ यांच्या डोक्याला लागली. त्यात ते जखमी झाले. त्याच अवस्थेत ते हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गेले. मेडिकलला उपचार झाल्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेत गायकवाडविरोधात गुन्हा दाखल केला.