Nagpur: फॉलोअर्स वाढल्याचे होर्डिंग लावले, तथाकथित इन्फ्लुएन्सरवर गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Updated: March 6, 2024 18:31 IST2024-03-06T18:31:07+5:302024-03-06T18:31:17+5:30
Nagpur News: स्वत:ला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणविणाऱ्या व विविध वादात असणाऱ्या समीर स्टायलोवर विनापरवानगी होर्डिंग लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने त्याच्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Nagpur: फॉलोअर्स वाढल्याचे होर्डिंग लावले, तथाकथित इन्फ्लुएन्सरवर गुन्हा दाखल
- योगेश पांडे
नागपूर - स्वत:ला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणविणाऱ्या व विविध वादात असणाऱ्या समीर स्टायलोवर विनापरवानगी होर्डिंग लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने त्याच्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मनपाच्या झोन क्रमांक सहाचे कनिष्ठ अभियंता अनिल मानकर यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. सेंट्रल एव्हेन्यूवरील सेवासदन इमारतीसमोर नेताजी चौकात सिग्नलवरच समीरचे अनधिकृत होर्डिंग लागले होते. तहसील पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप बुवा यांनी मानकर यांना ही माहिती दिली. फॉलोअर्स वाढल्याबाबतचे हे होर्डिंग होते. मानकर यांच्या पथकाने ते होर्डिंग काढले. त्यानंतर तहसील पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली. पोलिसांनी समीर स्टायलोसह होर्डिंगवर फोटो असलेल्या दोन अज्ञात तरुणांविरोधात विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल केला. समीर स्टायलो याअगोदरदेखील विविध वादांत राहिलेला आहे. त्याच्याविरोधात मागील वर्षी एका तरुणीने विनयभंगाची तक्रार केली होती व पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला होता. तर २०२२ साली रात्री वेगात कार चालवत असताना अपघात झाला होता. त्यावेळी स्टायलोसह कारमधील तीन जण जखमी झाले होते.