नागपूर उच्च न्यायालयानेही अनुभवला शपथविधी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 21:34 IST2019-08-23T21:22:23+5:302019-08-23T21:34:16+5:30
मुंबई येथे पार पडलेल्या हा शपथविधी सोहळा लाईव्ह पाहता यावा, यासाठी नागपूर उच्च न्यायालयाच्या सभागृहात तशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे हा लाईव्ह शपथविधी सोहळा नागपूरकरांनाही अनुभवता आला.

नागपूर उच्च न्यायालयानेही अनुभवला शपथविधी सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेल्या शिफारशीनुसार नागपूर येथील अॅड. अनिल किलोर व अॅड. अविनाश घरोटे यांच्यासह चार वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती प्रदान केली असून शुक्रवारी राज्याचे मुख्य न्यायाधीशांनी त्यांना शपथ दिली. मुंबई येथे पार पडलेल्या हा शपथविधी सोहळा लाईव्ह पाहता यावा, यासाठी नागपूर उच्च न्यायालयाच्या सभागृहात तशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे हा लाईव्ह शपथविधी सोहळा नागपूरकरांनाही अनुभवता आला.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्या. प्रदीप देशमुख, न्या. सुनील शुक्रे, न्या. झेड.ए. हक, न्या. अतुल चांदूरकर, न्या. विनय देशपांडे, न्या. स्वप्ना जोशी, न्या. रोहित देव, न्या. मनीष पितळे, न्या. मुरलीधर गिरटकर, न्या. श्रीराम मोडक, न्या. विनय जोशी, न्या. पुष्पा गणेडीवाला, सरकारी वकील अॅड. सुमंत देवपुजारी, अतिरिक्त सॉलिसटर जनरल उल्हास औरंगाबादकर, प्रबंधक प्रशासन अतुल शहा आदींसह अनेक वरिष्ठ व वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किलोर यांचे कुटुंबीयही सहभागी
न्यायामूर्ती अनिल किलोर यांचा शपथविधी पाहण्यासाठी त्यांच्या वलगाव, अमरावती येथील कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले होते. यात न्या. किलोर यांचे काका नानासाहेब किलोर, काकू रत्नाबाई आणि सुनंदाबाई, तर सावत्र भाऊ प्रभाकर, प्रवीण, योगेश, गौरव सहभागी झाले होते. हे कुटुंबीय खास पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या कुटुंबातील व्यक्ती आज न्यायमूर्तीपदावर पोहाचल्याचा अत्यानंद होत असल्याचे मत त्यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केले.
नागपुरातील अनेक वकील व मान्यवर मुंबईत सहभागी
न्या. अनिल किलोर व न्या. अविनाश घरोटे यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागपुरातील अनेक ज्येष्ठ वकिलांसह अनेक मान्यवर मंडळी मुंबईला गेली होती. जी मंडळी मुंबईला जाऊ शकली नाहीत ते नागपुरातील लाईव्ह सोहळ्यात सहभागी झाली होती.