Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!

By योगेश पांडे | Updated: August 30, 2025 17:55 IST2025-08-30T16:34:59+5:302025-08-30T17:55:23+5:30

Nagpur : स्वतःच्या हुशारीवर विश्वास असलेल्या एंजेलच्या मनात परिचारिका किंवा पॅरामेडिकलचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न होते. मात्र, एकतर्फी प्रेमात आंधळ्या झालेल्या अल्पवयीन नराधमाने तिच्यासोबतच तिच्या कुटुंबीयांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली.

Nagpur Girl Stabbed: Mother's companionship was lost for a day and Angel was gone forever! | Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!

Nagpur Girl Stabbed: Mother's companionship was lost for a day and Angel was gone forever!

Nagpur Crime News: अतिशय हलाखीची परिस्थिती असूनदेखील स्वतःच्या हुशारीवर विश्वास असलेल्या एंजेलच्या मनात परिचारिका किंवा पॅरामेडिकलचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न होते. मात्र, एकतर्फी प्रेमात आंधळ्या झालेल्या अल्पवयीन नराधमाने तिच्यासोबतच तिच्या कुटुंबीयांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. 'एंजेल'ने आरोपीच्या डोळ्यांतील रक्ताळलेला विखार अगोदरच ओळखला होता अन् त्यामुळेच घरच्यांना माहिती दिली होती. मात्र, बेसावध क्षणी तिला भर रस्त्यावर गाठत त्याने तिची हत्या केली. या घटनेमुळे ११ मार्च २०११ रोजी नंदनवनमध्ये झालेल्या मोनिका किरणापुरे हत्याकांडाच्या कटु स्मृती जाग्या झाल्या आहेत.

एंजेल जॉन या दहावीतील विद्यार्थिनीची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. कौशल्यायन नगरमधील एका लहानशा घरात ती आई, भाऊ, आजी, आजोबांसोबत राहत होती. तिचे वडील अनेक वर्षांपासून वेगळे राहतात व तिचा सांभाळ तिच्या आईचे आई-वडीलच करत होते.

अल्पवयीन आरोपीसोबत तिची ओळख होती व त्याने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच्या वाईट संगत व विक्षिप्त स्वभावामुळे एंजेलने दोन महिन्यांअगोदरच संपर्क तोडला होता. यावरूनच आरोपी संतापला होता. तो सातत्याने तिचा पाठलाग करायचा व शाळेजवळ तिला थांबवून बोलण्याचा आग्रह करायचा. त्याच्या नजरेतील विखार तिच्या लक्षात आला होता व तिने कुटुंबीय व मैत्रिणींना याची कल्पना दिली होती.

मोनिका किरणापुरे हत्याकांडाच्या स्मृती ताज्या

एंजेलच्या हत्येमुळे साडेचौदा वर्षांपूर्वी नागपूरसह देशाला हादरविणाऱ्या मोनिका किरणापुरे हत्याकांडाच्या कटू स्मृती जाग्या झाल्या. ११ मार्च २०११ रोजी नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील, दर्शन कॉलनी ते श्रीनगरदरम्यान रस्त्यावर कुणाल जयस्वाल या आरोपीने सुपारी देत मोनिका किरणापुरे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला भर रस्त्यावर संपविले होते. कुणालला त्याच्या प्रेयसीची हत्या करायची होती. मात्र, मारेकऱ्यांनी मोनिकाला संपविले होते.

एका दिवसाचा खंड पडला अन् होत्याचे नव्हते झाले

एंजेलच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतरदेखील आरोपी अल्पवयीन मुलगा सातत्याने तिचा पाठलाग करीतच होता. त्यामुळेच शाळेत येणे-जाणे करताना एंजेलबरोबर तिची आई किंवा आजी सोबत राहायचे. शुक्रवारी सकाळी तिच्या आईने तिला शाळेत सोडले. मात्र, दुपारी तिला घ्यायला जाणे कुणालाही जमले नाही.

त्यानंतर काही क्षणांतच होत्याचे नव्हते झाले. तिच्या आई-आजीचा आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. 'मी सोबत गेली असती तर माझ्या काळजाचा तुकडा वाचला असता हो...' असाच आक्रोश आजीकडून सुरू होता. तर तिचे आजोबा आजीची प्रकृती खालावू नये यासाठी त्या परिस्थितीतदेखील धडपड करताना दिसून आले.

Web Title: Nagpur Girl Stabbed: Mother's companionship was lost for a day and Angel was gone forever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.