Nagpur girl in Hollywood | नागपूरकन्येची हॉलिवूडमध्ये ‘एन्ट्री’
नागपूरकन्येची हॉलिवूडमध्ये ‘एन्ट्री’

ठळक मुद्देलॉस एंजलिसमध्ये पाय रोवतेय नयनाफिल्म निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण

निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हॉलिवूड म्हणजे जगभरातील चित्रपट कलावंतांची पंढरी. म्हणूनच या क्षेत्रात काम करणारे कलावंत, तंत्रज्ञ हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात. अगदी मायानगरी मुंबईच्या मोठमोठ्या कलावंतांना ही सुप्त इच्छा असते. हे स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्यासाठी एका नागपूरकन्येने वाटचाल सुरू केली आहे. अवघ्या पंचेविशीत असलेल्या या तरुणीने स्वत:च्या कौशल्यातून अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये केवळ पायच रोवला नाही तर दोन चित्रपटांच्या निर्मितीचे कामही सुरू केले आहे.
नयना गाडे असे या तरुणीचे नाव आहे. टीव्हीवरील मालिकांमधली जादूई दुनिया पाहताना आपणही या क्षेत्रात काम करावं, हे स्वप्न लहानपणापासून उराशी बाळगलेली नयना. या स्वप्नाने मोठेपणीही तिचा पिच्छा सोडला नाही. अमरावती बोर्डातून १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आधीच घेतलेल्या माहितीनुसार तिने मुंबई गाठली आणि बॅचलर इन मास मीडिया या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. नाट्य व फिल्म मेकिंगचे तंत्र ती या अभ्यासक्रमात शिकली. कोर्सच्या अंतिम वर्षात विद्यार्थ्यांचा नाटक व लघुपट निर्मितीचा अनुभव यावा म्हणून चित्रपट व नाट्य क्षेत्रातील मान्यवर कलावंत व तज्ज्ञांशी संवाद व्हायचा. या संवादातूनच कोर्स पूर्ण झाल्यानंतर नयनाला बीबीसीच्या एका शोमध्ये सहायक निर्माती म्हणून संधी मिळाली व पुढे विविध टीव्ही वाहिन्यांवर काही मालिका व रिअ‍ॅलिटी शोमध्ये असोसिएट प्रोड्यूसर म्हणूनही संधी मिळत गेल्या.
या कामादरम्यान आणखी शिकण्याची धडपड सुरूच होती. टीव्ही इंडस्ट्रीत काम करताना चित्रपट निर्मितीच्या तांत्रिक बाजू तिला खुणावू लागल्या. या क्षेत्रातील तंत्राचे अत्याधुनिक व सखोल ज्ञान घेण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असताना न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी या जगप्रसिद्ध फिल्म प्रोड्यूसिंग इन्स्टिट्यूटमध्ये दोन वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. कामाचा अनुभव व इंग्रजी भाषेच्या कौशल्यामुळे नयनाला या इन्स्टिट्यूटमध्ये संधीही चालून आली आणि मग सुरू झाला स्वप्नांचा प्रवास.कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची तळमळ, त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द नयनाने हळूवारपणे थेट हॉलिवूडमध्ये भक्कमपणे पाय रोवायला सुरुवात केली आहे. योग्य पटकथेची निवड, त्यातील संवाद लेखन, निर्देशन, संपादनामध्ये समन्वय साधणे, प्रोजेक्टच्या यशस्वी पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करणे, योग्य कलावंत व तंत्रज्ञांची जमवाजमव, चित्रीकरणासाठी योग्य स्थळाची निवड, सेटस्ची उभारणी, ध्वनिसंयोजन व संगीत संयोजनात लक्ष ठवणे, अ‍ॅनिमेशन, कलर मिक्सिंग, रेकॉर्डिंग अशा बऱ्याच जबाबदाºया प्रोड्यूसरला प्रोडक्शन टीमच्या मदतीने सांभाळाव्या लागतात. स्वत:च्या तांत्रिक क्षमतेने, अभ्यासू व चिकाटी वृत्तीने हे आव्हान नयनाने आपल्या खांद्यावर घेतले असून, स्वप्नांच्या दुनियेतील स्वप्नपूर्तीकडे तिचा प्रवास वेग धरायला लागला आहे.

प्रोड्युसर, रायटर व क्रिएटिव्ह डायरेक्टरची जबाबदारी
शैक्षणिक सत्रातील आव्हानात्मक प्रोजेक्टस्मुळे अनुभव व क ल्पकवृत्तीचे जाणकार, प्रस्थापित चित्रपट निर्माते, अभिनय क्षेत्रातील मान्यवर व तंत्रज्ञांशी व्यावसायिक संबंध तयार झाले. याच संबंधातून व तिच्या कलात्मक कौशल्यातून २०१८ ला अभ्यासक्रमाच्या समाप्तीनंतर ‘शुगर’ या चित्रपटाची कार्यकारी निर्माती म्हणून काम करण्याची संधी मिळाली व तिनेही या संधीचे सोने केले. यानंतर टीव्ही वाहिनीवर एक मालिका व आता ‘स्नॅप्ड’ या दुसºया चित्रपटाच्या प्रोड्यूसर रायटर व क्रिएटिव्ह डायरेक्टरची जबाबदारी तिला मिळाली आहे.

Web Title: Nagpur girl in Hollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.