नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 23:18 IST2025-07-28T23:15:14+5:302025-07-28T23:18:34+5:30
Khaparkheda Police Station: गृह विभागातर्फे यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाचा परत एकदा विस्तार झाला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत आतापर्यंत ३४ पोलीस ठाणे होते. आता खापरखेडा पोलीस ठाणे हे देखील शहराशी जोडले जाणार आहे. गृह विभागातर्फे यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
नागपूर शहराच्या उत्तर दिशेला पोलीस आयुक्तालयाची हद्द कोराडीपर्यंत आहे. कोराडीतील औष्णिक विद्युत केंद्रात अनेक कामगार कार्य करतात. अनेक अधिकारी-कामगारांचे वास्तव्य खापरखेडा येेथे आहे. मात्र तेथील पोलीस ठाणे हे नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यकक्षेत येते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करताना कार्यक्षेत्रात बदल होतो व त्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी येतात. खापरखेडा पोलीस ठाणे नागपूर पोलीस आयुक्तालयाला जोडल्या गेले तर अनेक प्रशासकीय अडचणी दूर होतील हे ध्यानात ठेवून त्याबाबत प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार गृह विभागाने याला मंजुरी दिली आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नव्या पोलीस ठाण्याची भर पडणार असल्याने या पोलीस ठाण्यातील मंजूर मनुष्यबळासह उपलब्ध पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार असे ५६ पोलीस आणि खापरखेडा पोलीस ठाण्याची इमारत हस्तांतरीत केली जाणार आहे. हे पोलीस ठाणे नवीन पोलीस उपायुक्त परिमंडळ सहाशी जोडले जाणार आहे.