सीबीआयच्या रडारवर नागपूरचा गँगस्टर आंबेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 20:23 IST2018-09-26T20:22:28+5:302018-09-26T20:23:20+5:30
आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड प्रकरणात गँगस्टर आंबेकर आणि इतर संशयास्पद व्यक्ती सीबीआयच्या रडारवर आल्या आहेत. सीबीआयची एक चमू आंबेकर आणि इतर लोकांची विचारपूस करून हे प्रकरण सोडवण्याच्या कामाला लागली आहे.

सीबीआयच्या रडारवर नागपूरचा गँगस्टर आंबेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड प्रकरणात गँगस्टर आंबेकर आणि इतर संशयास्पद व्यक्ती सीबीआयच्या रडारवर आल्या आहेत. सीबीआयची एक चमू आंबेकर आणि इतर लोकांची विचारपूस करून हे प्रकरण सोडवण्याच्या कामाला लागली आहे.
सेंट्रल एव्हेन्यू येथील रहिवासी ७२ वर्षीय एकनाथ निमगडे यांची ६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी सेंट्रल एव्हेन्यू लाल इमली चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. निमगडे हे गांधीबाग येथील उद्यानातून दुचाकीने घरी परत जात होते. त्याचवेळी त्यांच्यावर दुचाकीने आलेल्या युवकाने देशी कट्ट्यातून गोळी झाडली होती. ज्येष्ठ नागरिकाच्या या हत्येने शहर पोलीस हादरले होते. निमगडे यांचा मुलगा अॅड. अनुपम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अनुपम यांनी संपत्तीच्या वादातून त्यांच्या वडिलांचा खून झाल्याचे सांगितले होते. त्याच्यानुसार त्यांच्या वडिलांची वर्धा रोडवर कोट्यवधी रुपयाची जमीन आहे. त्यावरून वाद सुरू होता. या वादात आंबेकरने त्याच्या वडिलांना धमकावले होते. तहसील पोलीस आणि गुन्हे शाखेने आंबेकर आणि या प्रकरणाशी संबंधित लोकांची विचारपूस केली. गुन्हे शाखेने सुद्धा या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास केला होता. सूत्रांनुसार या तपासाच्या नावावर गुन्हे शाखेतील तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वसुलीही केली.
पोलिसांच्या तपासाने असंतुष्ट होऊन अनुपम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला. यानंतर तहसील पोलिसांनी प्रकरणाशी संबंधित दस्तावेज सीबीआयकडे सोपविले आहे. सूत्रानुसार या प्रकरणात आंबेकर याच्याशिवाय एक नेता, ट्रान्सपोर्ट व्यवसायी आणि त्याच्याशी जुळलेले लोक संशयाच्या घेºयात आहेत. सीबीआय चमू सर्वांचीच वेगवेगळी विचारपूस करणार आहे. यानंतर सर्वांना एकमेकांसमोर बसवून विचारपूस केली जाईल.
निमगडे यांची हत्या सुनियोजित पद्धतीने करण्यात आली होती. यात घटनेनंतर कुठलाही पुरवा सोडण्यात आला नाही. हल्लेखोरांनी आपला चेहरा लपविलेला होता. त्यांना निमगडेंच्या येण्या-जाण्याचा मार्ग माहिती होता. या प्रकारची हत्या सराईत सुपारी किलर करतात.
तुरुंगात बंद गुन्हेगारांवरही नजर
सूत्रानुसार या प्रकरणात सीबीआयची तुरुंगात बंद गँगस्टरसह काही गुन्हेगारांवरही नजर आहे. हे गुन्हेगार जमिनीच्या वादाशी जुळलेले होते. यातून त्यांनी मोठी संपत्ती जमविली आहे. सीबीआयची चमू त्यांचीही विचारपूस करणार आहे.