नागपुरात माजी नगरसेवकाचा शेजाऱ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 21:26 IST2020-07-16T21:25:10+5:302020-07-16T21:26:51+5:30
घरासमोर बाईक पार्क करण्यावरुन झालेल्या वादामध्ये माजी नगरसेवकासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी शेजाऱ्यावर हल्ला केला. या घटनेमध्ये शेजारी राहणारा युवक आणि त्याचा चुलत भाऊ जखमी झाले. सक्करदरामधील गवंडीपुरा येथे बुधवारी रात्री ही घटना घडली.

नागपुरात माजी नगरसेवकाचा शेजाऱ्यावर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरासमोर बाईक पार्क करण्यावरुन झालेल्या वादामध्ये माजी नगरसेवकासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी शेजाऱ्यावर हल्ला केला. या घटनेमध्ये शेजारी राहणारा युवक आणि त्याचा चुलत भाऊ जखमी झाले. सक्करदरामधील गवंडीपुरा येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी माजी नगरसेवक अनिल वाघमारे आणि त्याच्या पत्नीसह पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अनिल वाघमारे (५१) हे गवंडीपुरा येथे राहतात. त्यांच्या शेजारीच अंकुश खाडे (२६) हा राहतो. बुधवारी रात्री अंकुशच्या घरी आत्या आणि त्यांचा मुलगा आकाश हे जेवणासाठी आले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशने अंकुशच्या घरासमोरच आपली बाईक पार्क केली होती. त्यामुळे रस्त्याने येजा करणाऱ्यांना अडचण होत होती. हे पाहून अनिल वाघमारे यांना राग आला. त्यांनी शिवीगाळ करून वाद घातला. अंकुशने वाघमारे यांना समजावून शिव्या न देण्यास सांगितले. त्यामुळे तो अधिकच चिडला. त्याने आपली पत्नी आरती, मुलगा शुभम वाघमारे, बॉबी वाघमारे तसेच मुलीच्या मदतीने हल्ला केला. यात अंकुश आणि आकाश जखमी झाले.
या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेनंतर आरोपी गायब झाले. सक्करदरा पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. हल्ला करणे, धमकावणे, मारहाण करणे आदी गुन्हे दाखल करून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेमुळे अंकुश खाडे यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपींनी कारण नसताना वाद घालून मारहाण केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.