खडगाव रोडवरील प्लास्टिक इंडस्ट्रीला आग; कंपनीतील ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचे लोट
By मंगेश व्यवहारे | Updated: March 26, 2024 13:25 IST2024-03-26T13:24:15+5:302024-03-26T13:25:17+5:30
मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अचानक घडली घटना

खडगाव रोडवरील प्लास्टिक इंडस्ट्रीला आग; कंपनीतील ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचे लोट
मंगेश व्यवहारे, नागपूर : वाडी परिसरातील खडगाव रोडवरील आंचल प्लास्टिक इंडस्ट्रीला मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. कंपनीत ज्वलनशील पदार्थ असल्याने आग काही क्षणातच पसरल्याने दूरपर्यंत आगीचे लोट दिसून येत होते.
अडीच वाजताच्या सुमारास घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. कळमेश्वरसह सिव्हीललाईन, नरेंद्रनगर, त्रिमूर्तीनगर येथून अग्निशमनचे बंब घटनास्थळी दाखल झाले. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले होते. आगीमध्ये कुठलीही जिवितहाणी झालेली नाही. परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्राचे केंद्राधिकारी आत्राम यांनी दिली. प्लास्टीक इंडस्ट्रीला आग लागल्याची महिन्याभरातील दुसरी घटना आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना कंपन्यांमध्ये करण्यात आल्या होत्या की नाही, याबाबत चौकशी होणार आहे.