नागपुरात क्षुल्लक कारणातून ड्रायव्हरला भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 20:32 IST2020-06-20T20:30:19+5:302020-06-20T20:32:22+5:30
पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला असल्याने थोडी गाडी बाजूला घ्या, नाहीतर तुमच्या अंगावर चिखल उडेल, अशी विनंती करणाऱ्या मालवाहक गाडीच्या ड्रायव्हरला दोन अज्ञात इसमांनी चाकूने भोसकले.

नागपुरात क्षुल्लक कारणातून ड्रायव्हरला भोसकले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला असल्याने थोडी गाडी बाजूला घ्या, नाहीतर तुमच्या अंगावर चिखल उडेल, अशी विनंती करणाऱ्या मालवाहक गाडीच्या ड्रायव्हरला दोन अज्ञात इसमांनी चाकूने भोसकले.
ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महागंगा सेलिब्रेशन हॉलसमोर घडली. जखमी झालेल्या युवकाचे नाव मोहित अरविंद ठाकरे (३२, रा. गंगानगर) आहे. मोहित आपली मालवाहक गाडी घेऊन फर्निचर भरण्यासाठी गरीब नवाज चौक येथे जात होता. महागंगा सेलिब्रेशन हॉलसमोरील रस्त्यावर चिखल असल्याने समोरून येणाºया मोपेड गाडी क्रमांक एमएच४९-बीएच-२८८६ या गाडीवर ३५ ते ४० वयोगटातील दोन इसम बसले होते. त्यांना मोहितने गाडी बाजूला घेण्यासाठी सांगितले. पण त्या दोघांनीही मोहितला शिवीगाळ सुरू केली. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जखमी झालेल्या मोहितला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाठोडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.