In Nagpur, the dowry took the victim of the newlyweds | नागपुरात हुंड्याने घेतला नवविवाहितेचा बळी

नागपुरात हुंड्याने घेतला नवविवाहितेचा बळी

ठळक मुद्देलग्नानंतर तीनच महिन्यात केली आत्महत्या : पतीसह चौघे आरोपी : गिट्टीखदान पोलिसांकडून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन महिन्यांपूर्वी लग्न करून सासरी आलेल्या नवविवाहितेने हुंड्यासाठी हपापलेल्या सासरच्या मंडळींच्या त्रासापायी आत्महत्या करून जीवन संपविले. चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी नवविवाहितेचा पती आणि त्याचे तीन नातेवाईक अशा चौघांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
प्रियंका सौरभ पटेल (वय २०) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारा तिचा पती आरोपी सौरभ रामकैलास पटेल, गीता रामकैलास पटेल, प्रियंका शिवपूजन कोठारे आणि रामकैलास तेजा पटेल अशी आरोपींची नावे आहेत. पांढराबोडी परिसरात राहणाऱ्या प्रियंका हिचा २६ फेब्रुवारी २०२० ला गिट्टीखदान मधील सुरेंद्रगड परिसरात राहणाºया सौरभ पटेल सोबत विवाह झाला होता. वैवाहिक जीवनाचे गुलाबी स्वप्न मनात घेऊन सासरी नांदायला आलेल्या प्रियंकामागे तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तगादा लावला. तिला टोचून बोलणे, मानसिक त्रास देणे सुरू झाले. अवघ्या तीनच महिन्यात सासरच्या मंडळींनी तिला जीव नकोसा करून टाकला. त्यांचा जाच असह्य झाल्यामुळे प्रियंकाने २१ मेच्या दुपारी ३.४५ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलीस तपासात प्रियंकाच्या आत्महत्येला तिचा पती आणि उपरोक्त आरोपी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. सासरच्या मंडळीमुळेच प्रियंकाने गळफास लावून घेतला, अशी तक्रार नीरज जगदीश पटेल ( वय २२, रा. पांढराबोडी, अंबाझरी) यांनी पोलिसांकडे नोंदविली. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी उपरोक्त आरोपीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: In Nagpur, the dowry took the victim of the newlyweds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.