नागपूर जिल्ह्यात ट्रकने दोन शालेय विद्यार्थ्यांना चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 13:31 IST2018-08-14T13:07:57+5:302018-08-14T13:31:05+5:30
उमरेड तालुक्यातील उमरेड-भिसी मार्गावर असलेल्या मालेवाडा शिवारात शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या मुलांना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडल्याची भीषण घटना मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.

नागपूर जिल्ह्यात ट्रकने दोन शालेय विद्यार्थ्यांना चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: उमरेड तालुक्यातील उमरेड-भिसी मार्गावर असलेल्या मालेवाडा शिवारात शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या मुलांना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडल्याची भीषण घटना मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. या अपघातात अनुराग मेश्राम व प्रवीण उल्हास रामटेके (रा. मालेवाडा)हे दोन विद्यार्थी जागीच ठार झाले आहेत. या अपघातात ट्रकच्या खाली चेंगरून दोन शेळ्याही मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे.
भिसी येथील म.गांधी विद्यालयात हे दोन्ही विद्यार्थी शिकत होते. त्यातील अनुराग हा नवव्या वर्गात तर प्रवीण हा त्या शाळेतील माजी विद्यार्थी होता. तो नुकताच दहावी पास झाला होता. मालेवाडा येथून दररोज सुमारे २०-२५ विद्यार्थी भिसी येथे शिक्षणासाठी जातात. रोजच्या नेमाप्रमाणे आजही हे विद्यार्थी रस्त्यावर उभे राहून बसची वाट पहात होते. अचानकपणे आलेल्या व अनियंत्रित झालेल्या ट्रकने या मुलांना जोरदार धडक दिली व तो ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. काही कळायच्या आत झालेल्या या अपघातात हे दोन विद्यार्थी व दोन शेळ्या ठार झाले. तेथे जमलेल्या संतप्त गावकऱ्यांनी ट्रकला आग लावल्याचेही वृत्त आहे.