Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
By शुभांगी काळमेघ | Updated: August 30, 2025 17:18 IST2025-08-30T17:16:44+5:302025-08-30T17:18:12+5:30
Monika Kiranapure Hatyakand : एंजेलच्या हत्येने साडेचौदा वर्षांपूर्वी नागपूरला हादरवून सोडलेल्या मोनिका किरणापुरे हत्याकांडाच्या दुखद आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. ११ मार्च २०११ रोजी नंदनवन परिसरात मोनिका किरणापुरे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला कुणाल जयस्वाल या आरोपीने सुपारी देऊन खून केला होता.

Nagpur Crime: Monica was murdered just like Angel; What happened in Nagpur on March 11, 2011?
Monika Hatyakand Nagpur: एकतर्फी प्रेमात आंधळ्या झालेल्या अल्पवयीन नराधमाने दहावीत शिकणाऱ्या अँजेलची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेनं नागपूर हादरले. प्रेमाच्या नावाखाली क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या या घटनेनं नागपुरकरांना मोनिकाच्या हत्येची आठवण झाली. चौदा वर्षांपूर्वी एंजेलप्रमाणेच मोनिका किरणापुरेची हत्या झाली होती. कोणतीही चूक नसताना मोनिकाला जीव गमावावा लागला होता.
अतिशय हलाखीची परिस्थिती असूनदेखील स्वतःच्या हुशारीवर विश्वास असलेल्या एंजेलच्या मनात परिचारिका किंवा पॅरामेडिकलचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न होते. मात्र, एकतर्फी प्रेमात आंधळ्या झालेल्या अल्पवयीन नराधमाने तिच्यासोबतच तिच्या कुटुंबीयांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. या घटनेमुळे ११ मार्च २०११ रोजी नंदनवनमध्ये झालेल्या मोनिका किरणापुरे हत्याकांडाच्या कटु स्मृती जाग्या झाल्या आहेत.
मोनिका किरणापुरे हत्याकांडाच्या स्मृती ताज्या
एंजेलच्या हत्येमुळे साडेचौदा वर्षांपूर्वी नागपूरसह देशाला हादरविणाऱ्या मोनिका किरणापुरे हत्याकांडाच्या कटू स्मृती जाग्या झाल्या. ११ मार्च २०११ रोजी नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील, दर्शन कॉलनी ते श्रीनगरदरम्यान रस्त्यावर कुणाल जयस्वाल या आरोपीने सुपारी देत मोनिका किरणापुरे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला भर रस्त्यावर संपविले होते. कुणालला त्याच्या प्रेयसीची हत्या करायची होती. मात्र, मारेकऱ्यांनी मोनिकाला संपविले होते.
काय आहे मोनिका किरणापुरे हत्याप्रकरण?
नंदनवनच्या केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असणा-या मोनिकाची ११ मार्च २०११ हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला कुणाल जयस्वाल सावरगावचा रहिवासी असून घटनेच्या वेळी तो काटोलच्या सेंट पॉल हायस्कूलचा शिक्षक होता.
कुणालचे केडीकेमध्ये शिकणाऱ्या आणि नंदनवनच्याच वसतिगृहात राहणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये बेबनाव निर्माण झाल्याने कुणाल हा आपला मित्र प्रदीप महादेव सहारे याला सोबत घेऊन २२ फेब्रुवारी २०११ रोजी केडीके कॉलेज येथे प्रेयसीला समजावण्यासाठी गेला होता.
दोघे समोरासमोर येऊनही ती काहीही न बोलता निघून गेली होती. त्यामुळे चिडून कुणालने आपल्या प्रेयसीला कायमचे संपविण्याचे ठरवले होते. याच वसतिगृहात राहणारी अन्य एक मुलगी कुणालच्या ओळखीची होती.
दोघीही एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी होत्या. मात्र ती कुणालच्या प्रेयसीच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून कुणालला मोबाईलवर कळवायची. दरम्यान कुणालने आपला मित्र प्रदीप याची माहिती देणाऱ्या मैत्रिणीसोबत ओळख करून दिली होती.
कुणालने प्रदीपला भाडोत्री गुंडांकडून आपल्या या प्रेयसीचा खून करण्यास सांगितले होते. मोमीनपुऱ्याच्या एका हॉटेलमध्ये खुनाचा कट रचण्यात आला होता. खुनासाठी एक लाखाची सुपारी देऊ करण्यात आली होती.
प्रत्यक्ष खुनाच्या एक दिवसाअगोदर कुणाल आणि प्रदीप हे नंदनवन येथील वसतिगृहानजीकच्या एका कॅफेत थांबले होते. मारेकऱ्यांना कुणालच्या प्रेयसीला तिच्याच मैत्रिणीच्या मार्फत दाखवण्यात आले होते.
घटनेच्या दिवशी कुणालची प्रेयसी वसतिगृहातून बाहेर पडल्याची माहिती तिच्या मैत्रिणीने कुणालला दिली. लागलीच मारेकऱ्यांनी मोटरसायकलींनी पाठलाग सुरू केला होता. ती कुणालची प्रेयसी नव्हती तर तिच्यासारखी दिसणारी निष्पाप मोनिका किरणापुरे होती.
कॉलेजचा गणवेश घालून आणि स्कार्फने चेहरा झाकून होती. तिच्यावर तीक्ष्ण व धारदार शस्त्रांचे दहा घाव घालण्यात आले होते. त्यापैकी तीक्ष्ण व धारदार जांबिया तिच्या पाठीत भोसकण्यात आला होता. खून केल्यानंतर लागलीच सर्व आरोपी काटोल येथे पळून गेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोनिकाचा मृत्यू झाला.
नागपूर सत्र न्यायालयाने मोनिकाच्या खून प्रकरणात चार आरोपींना दोषी ठरवले असून इतर दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाने कुणाल अनिल जयस्वाल, प्रदीप महादेव सहारे, श्रीकांत सारकर, उमेश मराठे या चौघांनाही दोषी ठरवले असून रामेश्वर सोनेकर आणि गीता मालधुरे यांना निर्दोष ठरवले आहे. दरम्यान या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मोनिकाच्या कुटुंबीयांची मागणी होती.