Nagpur Crime: पती-पत्नी, OYO हॉटेल आणि तरुणी; संशय आला अन छापा टाकला; सगळं बघून पोलिसही अवाक
By शुभांगी काळमेघ | Updated: September 11, 2025 17:07 IST2025-09-11T17:05:02+5:302025-09-11T17:07:57+5:30
Nagpur : ऑपरेशन शक्ति अंतर्गत करण्यात आलेल्या या छाप्यामध्ये या व्यापाराचे कर्ते धर्ते पती-पत्नीच निघाले पोलिसांनी त्यांना अटक केले असून, त्यांच्यासोबत काम करणारा दलाल सध्या फरार आहे.

Nagpur Crime: Husband and wife, OYO hotel and young woman; Suspicion arose and raid was conducted; Even the police were speechless after seeing everything
नागपूर : शहराच्या गर्दीमध्ये गरजा पूर्ण होण्याच्या प्रयत्नात असलेल्या भोळ्या मुलींच्या शोधात राक्षस फिरत आहेत. त्याचाच प्रत्यय नागपूर पोलिसांकडून 'ऑपरेशन शक्ति' अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत समोर आला आहे. नागपूर शहरातील यशोधरानगर परिसरातील एका ओयो हॉटेलमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत देहव्यवसाय रॅकेट उघडकीस आले आहे. ऑपरेशन शक्ति अंतर्गत करण्यात आलेल्या या छाप्यामध्ये या व्यापाराचे कर्ते धर्ते पती-पत्नीच निघाले पोलिसांनी त्यांना अटक केले असून, त्यांच्यासोबत काम करणारा दलाल सध्या फरार आहे. तो मुलींना फूस लावून या कृत्यात ओढत होता. घटनास्थळी दोन मुलींची सुटका करण्यात आली, मुलींच्या चेहऱ्यावरून त्या घाबरलेल्या आणि अनभिज्ञ होत्या. मोठ्या प्रमाणात रोकड व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
ऑपरेशन शक्ति अंतर्गत छापा
क्राइम ब्रांचच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. यशोधरानगर भागातील एका ओयो हॉटेलमध्ये संशयास्पद हालचालींच्या माहितीवरून पोलिसांनी ११ सप्टेंबर रोजी अचानक छापा टाकला. छाप्यात दोन मुली व एक जोडपे आढळून आले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे मनीषपाल सिंह सुदर्शन राजपूत आणि त्याची पत्नी सिमरनी मनीषपाल राजपूत अशी आहेत. हे दोघं मिळून आर्थिक गरजू मुलींना कामाचे आमिष दाखवून त्यांना देहव्यवसायात ढकलत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. त्यांच्यासोबत काम करणारा एक एजंट आहे जो शहरात गरजू मुलींच्या शोधात असे. मात्र छाप्याच्या वेळी तो पळून गेला होता.
पोलिसांनी केली पीडितांची सुटका
छाप्याच्या वेळी पोलिसांनी रु १.५ लाख रोख रक्कम, मोबाईल फोन, आणि इतर कागदपत्रे जप्त केली. या कागदपत्रांवरून असे स्पष्ट झाले आहे की, हे रॅकेट केवळ नागपूरपुरता मर्यादित नसून आसपासच्या जिल्ह्यांमध्येही याचे जाळे पसरलेले असू शकते.
सुटका करण्यात आलेल्या दोन मुलींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, त्यांना कामाचे आमिष दाखवून हॉटेलमध्ये बोलावण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरुद्ध अनैतिक मानवी व्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PITA Act) गुन्हा दाखल केला आहे. फरार दलालाचा शोध सुरू असून, हॉटेल मॅनेजरची यात काय भूमिका आहे हे देखील तपासले जात आहे.
नागपूर पोलिसांचे 'ऑपरेशन शक्ति' हे अशा अवैध रॅकेट्सविरोधातील एक ठोस पाऊल ठरले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा कुठल्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ माहिती द्यावी, जेणेकरून अशा अमानवी व्यवहारांना आळा बसू शकेल.