Crime news Nagpur: एका रेती व्यावसायिकाचा मृतदेह कारमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर-सावनेर मार्गावर पाटणसावंगी जवळ असलेल्या लाहोरी इन बार अॅण्ड रेस्टॉरंटसमोर उभ्या कारमध्ये साजन मनोज मिश्रा याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. दुपारी साजन कार घेऊन घराबाहेर पडला होता. नंतर त्याचा मृतदेह कारमध्ये मिळाला.
लाहोरी इन बार अॅण्ड रेस्टॉरंट समोर बोलेरो कार उभी होती. त्या कारमध्ये रेती व बिल्डिंग मटेरियल सप्लायर व्यावसायिकाचा साजन मनोज मिश्रा (३०, रा. चणकापूर, ता. सावनेर) याचा मृतदेह पडलेला होता.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (१९ सप्टेंबर) दुपारी साजन घरातून बाहेर पडला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परत न आल्याने वडील मनोज मिश्रा यांनी पहाटे शोध घेण्यास सुरुवात केली.
कारमध्ये पडलेला होता साजनचा मृतदेह
शोध घेत असताना त्यांना लाहोरी बारसमोर साजनची बोलेरो कार (क्रमांक एम.एच.३१-इके-०४३८) उभी असल्याचे दिसून आले. गाडी उघडून पाहिल्यावर साजन ड्रायव्हिंग सीटवर पडलेला आढळला. त्याला तातडीने नागपूर येथील मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, दारूचे अति सेवन व हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण असावे, अशी माहिती मिळाली आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासणी
घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासणी, तसेच मृतकाच्या मित्रपरिवाराची चौकशी सुरू केली आहे. साजन याच्या पार्थिवावर शनिवारी संध्याकाळी चणकापूर येथील कोलार घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मानेवर व पायावर जखमा कशाच्या?
साजनच्या मानेवर व पायावर जखमा असल्याने गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.
सावनेर पोलीस ठाण्यातील अधिकारी उमेश पाटील यांनी सांगितले की, "दारूचे अतिसेवन केल्याने साजनचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे खरे कारण कळेल. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे."