नागपूर शहर जलमय : चार तासात ७७.२ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 22:50 IST2019-09-06T22:39:44+5:302019-09-06T22:50:51+5:30
हवामान विभागाने शुक्रवारी नागपुरात ऑरेंज अलर्ट जारी केले होते. त्यानुसार अतिवृष्टी झाली. सकाळी ८.३० वाजेपासून तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरात ७७.२ मि.मी. इतका पाऊस झाला.

नागपूर शहर जलमय : चार तासात ७७.२ मिमी पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवामान विभागाने शुक्रवारी नागपुरात ऑरेंज अलर्ट जारी केले होते. त्यानुसार अतिवृष्टी झाली. सकाळी ८.३० वाजेपासून तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरात ७७.२ मि.मी. इतका पाऊस झाला. पूर्व, दक्षिण, उत्तर, पश्चिम भागातील बहुतांश भागातील वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी घुसले. दरम्यान हवामान विभागाने उद्या शनिवारी ७ सप्टेंबर रोजीसुद्धा रेड अलर्टचा इशारा दिला आहे.
शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले. थोड्यात वेळात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दुपारी ३.४५ वाजेपर्यंत तो सुरू होता. पावसाचा जोर थोडा कमी झाला परंतु पावसाच्या सरी मात्र सुरूच होत्या. यामुळे शहरातील जवळपास २५० पेक्षा अधिक मुख्य मार्गावर पाणी साचले. पाऊस गेल्यानंतर साचलेले पाणी काढण्यासाठी अनेक तास लागले.
दरम्यान विदर्भातील बुलडाणा आणि अकोला सोडून उर्वरित सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज व रेड अलर्ट जारी केले आहे. नागपुरात ७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. कमी दबावाचे क्षेत्र ओडिसावरून छत्तीसगडकडे वळले आहे. त्यामुळे मध्यभारतात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऑरेंज अलर्ट दरम्यान २४ तासात ६५ ते १२५ मि.मी पाऊस होतो. तर रेड अलर्टमध्ये १२५ ते २०० मिमी पाऊस होऊ शकतो. नागपुरात शुक्रवारी केवळ ४ तासात ७७.२ मि.मी पाऊस झाला. अशा परिस्थितीत ऑरेंज अलर्टची शक्यता खरी ठरली.
विदर्भातील अनेक भागात मुसळधार पाऊस
गेल्या २४ तासात विदर्भातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, ब्रह्मपुरीमध्ये अतिवृष्टी झाली. ब्रह्मपुरी जिल्ह्यातील हवामान विभागाने २२२.४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ५०.६ मि.मी., अमरावती जिल्ह्यात २५.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तालुका स्तरावरचा विचार केल्यास गडचिरोलीतील देसाईगंज येथे सर्वाधिक २१० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. याशिवाय आरमोरी (गडचिरोली)मध्ये १७० मि.मी., धानोरा (गडचिरोली) १०० मि.मी., कुरखेडा (गडचिरोली) ९० मि.मी., भामरागड ९० मि.मी. आणि लाखनी (भंडारा) १०० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे.