नागपूर शहरात ‘स्क्रिनिंग’च्या आधारे घरांचे होतेय सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 13:51 IST2020-04-24T13:51:39+5:302020-04-24T13:51:58+5:30
नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या विशेष चमू प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक घराचा दौरा करीत आहेत. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले होते काय, कोरोनाबाबत लक्षणे वाटतात काय हे प्रश्न विचारून स्क्रिनिंगच्या आधारे कोरोनाच्या संशयितांंची माहिती घेण्यात येत आहे.

नागपूर शहरात ‘स्क्रिनिंग’च्या आधारे घरांचे होतेय सर्वेक्षण
राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १०० च्या जवळपास पोहोचली आहे. ही शहरवासीयांसाठी चिंतेची बाब आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शहरातील एकू ण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७५ टक्के रुग्ण मध्य व पूर्व नागपुरातील काही निवडक परिसरातील आहेत. हे परिसर शहरातील प्रमुख बाजारपेठेच्या भागात आहेत. अशा स्थितीत संबंधित परिसराला रेड झोन म्हणून घोषित करून प्रतिबंधित केले आहे. या परिसराच्या बाजूने जाण्यासही नागरिकांना भीती वाटत आहे. परिसर प्रतिबंधित करून कोरोना कसा संपेल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ‘लोकमत’ने याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. परिसर सील करून कोरोना संपणार नाही. त्यासाठी नागरिकांचे ‘स्क्रिनिंग’ हे मोठे शस्त्र आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या विशेष चमू प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक घराचा दौरा करीत आहेत. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले होते काय, कोरोनाबाबत लक्षणे वाटतात काय हे प्रश्न विचारून स्क्रिनिंगच्या आधारे कोरोनाच्या संशयितांंची माहिती घेण्यात येत आहे. त्यानंतर गरज भासल्यास त्यांना क्वारंटाईन करून नमुने घेण्यात येत आहेत. त्यानंतर उपचार करण्यात येतात. ही प्रक्रिया सातत्याने १४ दिवस सुरू असते.
शहरातील पाच प्रतिबंधित क्षेत्रात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ३१३ चमू २४५५९ घरी जाऊन १ लाख ६ हजार ९०९ नागरिकांची माहिती जाणून घेत आहेत. यात ज्यांना सर्दी, खोकला, ताप, घशात दुखणे अशी लक्षणे दिसल्यास त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. कोरोना असल्याची पुष्टी झाल्यास त्यांना भरती करण्यात येत आहे. हेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठे शस्त्र ठरत आहे. नागपुरातील ९८ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४६ पॉझिटिव्ह रुग्ण सतरंजीपुरातील ६८ वर्षीय मृत पॉझिटिव्ह व्यक्तीपासून प्रादुर्भाव झालेले आहेत. याशिवाय सतरंजीपुरा जवळील शांतिनगरात ८, कुंदनलाल गुप्ता नगरात १, भालदारपुरात १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. तर मध्य नागपुरातील मोमीनपुरा भागात आतापर्यंत ९, टिमकीत १ आणि मरकजमध्ये आलेले जबलपूरचे ८ रुग्ण आढळले आहेत. हा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. अशा स्थितीत परिसर सील करून स्क्रिनिंग केले नसते तर शहरात रुग्णांची संख्या १ हजारावर गेली असती.
हे परिसर झाले कोरोनामुक्त
ज्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले त्या परिसरात सर्वात आधी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यानंतर महापालिकेने आपल्या पद्धतीत बदल केला. कोरोनाचा रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर सील करून दररोज स्क्रिनिंगला सुरुवात केली. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. त्या आधारावरच लक्ष्मीनगर झोनच्या बजाजनगर, खामला, जरीपटका, धंतोली परिसराला कोरोनामुक्त करण्यात महापालिकेला यश मिळाले. जे परिसर कोरोनामुक्त झाले त्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी २२५ चमू गठित करण्यात आल्या. दररोज ३०५१७ घरातील ११९४०४ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले.
दररोज जाणून घेताहेत नागरिकांची स्थिती
सतरंजीपुरा झोनच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी माने यांनी सांगितले की, कोरोनाचा रुग्ण आढळताच परिसर सील करण्यात आला. त्यानंतर मुख्य काम सुरु झाले. दररोज संबंधित परिसरात आरोग्य विभागाच्या चमू जाऊन माहिती गोळा करीत आहेत. ज्या नागरिकांमध्ये लक्षणे आढळली त्यांच्यावर उपचार करण्यात येतात.