नागपुरात  पुन्हा १६ टक्के मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 23:00 IST2021-06-17T23:00:15+5:302021-06-17T23:00:53+5:30

children corona vaccine कोरोना लसीची लहान मुलांवर होत असलेल्या चाचणीत पुन्हा १६ टक्के मुलांमध्ये प्रतिपिंडाची (अँटिबॉडी) निर्मिती झाल्याचे आढळून आले.

In Nagpur, antibodies were again found in 16% of children | नागपुरात  पुन्हा १६ टक्के मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडी

नागपुरात  पुन्हा १६ टक्के मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडी

ठळक मुद्दे कोरोना लसीची लहान मुलांवर चाचणी : लस देण्यात आलेल्या मुलांची प्रकृती उत्तम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना लसीची लहान मुलांवर होत असलेल्या चाचणीत पुन्हा १६ टक्के मुलांमध्ये प्रतिपिंडाची (अँटिबॉडी) निर्मिती झाल्याचे आढळून आले. ६ ते १२ वयोगटातील चाचणीसाठी निवड करण्यात आलेल्या ३० पैकी अँटिबॉडी वाढलेली ५ मुले होती. यापूर्वी १२ ते १८ वयोगटातील ५० मधून १० मुलांमध्ये म्हणजे, २० टक्के मुलांमध्ये अँटिबॉडी निर्माण झाल्याचे दिसून आले होेते.

कोरोनाच्या गंभीरतेपासून लहान मुलांना दूर ठेवण्यासाठी भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोव्हॅक्सीन’ लसीची मुलांवरील मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. राज्यात केवळ नागपुरात बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या पुढाकारात २ ते १८ वयोगटात ही चाचणी केली जात आहे. यातील पहिल्या टप्प्यात, १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची चाचणी ६ जून रोजी पार पडली. यासाठी निवड करण्यात आलेल्या ५० मुलांमधून १० मुलांमध्ये अँटिबॉडीची निर्मिती झाल्याचे आढळले होते. तेव्हा सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात, ६ ते १२ वर्षे वयोगटातील चाचणीसाठी ३० मुलांची निवड करण्यात आली. १६ जून रोजी या मुलांचा रक्ताच्या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. यात ५ मुलांमध्ये अँटिबॉडी वाढल्याचे दिसून आले. यामुळे २५ मुलांनाच कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला. यावरून नकळत लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना होऊन गेला असावा, अशी शक्यता आता बालरोगतज्ज्ञ वर्तवित आहे.

तिसऱ्या टप्प्यात २ ते ६ वयोगटातील मुलांवर चाचणी

डॉ. खळतकर यांनी सांगितले, तिसऱ्या टप्प्यात २ ते ६ या वयोगटातील मुलांची चाचणी होणार आहे. यासाठी सुद्धा ३० मुलांची निवड करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात ही चाचणी होईल. आतापर्यंत लस देण्यात आलेल्या मुलांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यामध्ये कुठलीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यांच्यावर प्रकृतीवर डॉक्टरांचे एक पथक लक्ष ठेवून आहे.

Web Title: In Nagpur, antibodies were again found in 16% of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.