नागपूर विमानतळावर कोट्यवधींचे छुपे सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:03 IST2018-05-13T00:03:02+5:302018-05-13T00:03:23+5:30
हवाईमार्गाने विदेशातून बेकायदेशीररीत्या विविध वस्तू घेऊन येणाऱ्यांवर केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर विभागाच्या ‘एअर कस्टम्स युनिट’चे बारीक लक्ष असते. गेल्या तीन वर्षांत नागपुरात अनधिकृतपणे माल घेऊन येणाऱ्या ४१ जणांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून सव्वादोन कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छुप्या पद्धतीने सोने आणण्याचा सर्वात जास्त प्रयत्न करण्यात आला, हे विशेष. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

नागपूर विमानतळावर कोट्यवधींचे छुपे सोने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवाईमार्गाने विदेशातून बेकायदेशीररीत्या विविध वस्तू घेऊन येणाऱ्यांवर केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर विभागाच्या ‘एअर कस्टम्स युनिट’चे बारीक लक्ष असते. गेल्या तीन वर्षांत नागपुरात अनधिकृतपणे माल घेऊन येणाऱ्या ४१ जणांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून सव्वादोन कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छुप्या पद्धतीने सोने आणण्याचा सर्वात जास्त प्रयत्न करण्यात आला, हे विशेष. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत ‘एअर कस्टम्स युनिट’ला किती सीमा शुल्क प्राप्त झाले, किती जणांनी ‘कस्टम्स’चे नियम तोडले, कितीचा मुद्देमाल जप्त झाला, सर्वात जास्त सीमा शुल्क कुठल्या वस्तूपासून मिळाले, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ २०१८ या कालावधीत हवाईमार्गाने बेकायदेशीररीत्या वस्तू आणणाºया ४१ जणांना ‘कस्टम’ने ताब्यात घेतले व त्यांच्यापैकी ३७ जणांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून एकूण २ कोटी ३८ लाख ७९ हजार ९०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सर्वात जास्त तस्करी सोने, सिगारेट व गुटख्याची
जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये सर्वात जास्त समावेश सोने, सिगारेट व गुटख्याचा समावेश होता. सोन्याच्या एकूण सात गोष्टी जप्त करण्यात आल्या. यांचे वजन ५ हजार ६७० ग्रॅम्स इतके होते व किंमत १ कोटी ४४ लाख ५५ हजार ७८१ रुपये इतकी होती.
सर्वाधिक कारवाई २०१५-१६ मध्ये
२०१५-१६ मध्ये १५ जणांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून १ कोटी १७ लाख ६० हजार १५२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. २०१६-१७ मध्ये १४ जणांवर कारवाई झाली तर २०१७-१८ मध्ये १२ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ७७ लाख १७ हजार ७९८ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
साडेतीन कोटींहून अधिक सीमा शुल्क
दरम्यान, या तीन वर्षांच्या कालावधीत ‘एअर कस्टम्स युनिट’ला २ हजार ५६२ प्रवाशांकडून सीमा शुल्क प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या शुल्काचा आकडा ३ कोटी ६४ लाख २५ हजार ९१९ इतका आहे. २०१६-१७ मध्ये सर्वाधिक १ हजार १५ प्रवाशांकडून १ कोटी ४७ लाख ११ रुपयांचे सीमा शुल्क प्राप्त झाले.