नागपुरात पुन्हा एक अवैध सावकारी प्रकरण उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 21:34 IST2020-09-24T21:33:31+5:302020-09-24T21:34:47+5:30
अवैध सावकाराने दीड लाख रुपयांच्या बदल्यात गहाण ठेवलेली इनोव्हा कार परस्पर विकून टाकल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेतून पुन्हा एक अवैध सावकारी प्रकरण उघडकीस आले आहे.

नागपुरात पुन्हा एक अवैध सावकारी प्रकरण उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध सावकाराने दीड लाख रुपयांच्या बदल्यात गहाण ठेवलेली इनोव्हा कार परस्पर विकून टाकल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेतून पुन्हा एक अवैध सावकारी प्रकरण उघडकीस आले आहे.
सतीश धारगावे (वय ४५) असे या प्रकरणातील आरोपी सावकाराचे नाव आहे. तो जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आशीनगरात राहतो. गोपालनगरातील राजेश पुरुषोत्तम बोरकर (वय ५१) यांना मुलीच्या शिक्षणाकरिता सप्टेंबर २०१७ मध्ये पैशाची निकड असल्यामुळे त्यांनी रमन रामटेके याच्या मदतीने आरोपी सावकार सतीश धारगावे यांच्याकडून दीड लाख रुपये दहा टक्के महिना व्याजाने घेतले. यावेळी बोरकर यांच्या आरोपीने कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेतल्या आणि गहाण म्हणून त्यांची इनोव्हा कार स्वत:कडे ठेवून घेतली. चार महिन्यांनंतर बोरकर यांनी रक्कम परत करण्यासाठी धारगावेसोबत संपर्क केला. त्याची रक्कम परत करून आपली कार वापस मागितली असता आरोपीने कार देण्यासाठी टाळाटाळ केली. तुला दिलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज लागले असून कार परत मिळणार नाही, असे आरोपी म्हणाला. दरम्यान, आरोपी सतीशचा भाऊ नितीन धारगावे याने ओएलएक्स अॅपवर बोरकर यांची कार विकण्याची जाहिरात टाकली. त्यानंतर पायल मोटरचे एजंट अतुल इंगळे यांच्याशी संगनमत करून धारगावे बंधू आणि इंगळे यांनी नंदनवनमधील राजेंद्र दहीकर याला ही कार परस्पर विकून टाकली. ही बाब लक्षात आल्यानंतर बोरकर यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणी बुधवारी फसवणुकीच्या तसेच अवैध सावकारीच्या कायद्यानुसार आरोपी सतीश आणि नितीन धारगावे तसेच अतुल इंगळेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.