नागपूर एसीबी एसपी पाटील यांची उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 22:43 IST2018-12-07T22:41:38+5:302018-12-07T22:43:52+5:30
महिला पोलीस शिपायाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेले एसीबीचे एसपी प्रद्युम्न (पीआर) पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांना तडकाफडकी मुंबई मुख्यालयात हजर होण्याचे निर्देश एका आदेशातून जारी करण्यात आले. तर, त्यांच्या रिक्त पदावर अमरावती एसीबीचे एसपी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली.

नागपूर एसीबी एसपी पाटील यांची उचलबांगडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला पोलीस शिपायाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेले एसीबीचे एसपी प्रद्युम्न (पीआर) पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांना तडकाफडकी मुंबई मुख्यालयात हजर होण्याचे निर्देश एका आदेशातून जारी करण्यात आले. तर, त्यांच्या रिक्त पदावर अमरावती एसीबीचे एसपी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली.
पाटील शरीरसुखाची मागणी करून अक्षरश: छळ करतात, अशी तक्रार पीडित महिला कर्मचाऱ्याने थेट पोलीस महासंचालक (एसीबी) संजय बर्वे यांच्याकडे पाठवली होती. त्याची गंभीर दखल घेत बर्वे यांनी विशाखा समितीकडून चौकशी करून घेतली. त्यासाठी १५ दिवसांपूर्वी मुंबईहून एसीबीची चौकशी समिती नागपुरात आली होती. त्यांनी तक्रारीची चौकशी करून पुन्हा मुंबई गाठली. चौकशीत भक्कम पुराव्याची साखळी मिळाल्याने पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार, मंगळवारी, ४ डिसेंबरला मुंबई एसीबीच्या मुख्यालयातून आलेल्या महिला एसीपीने पीडित महिला पोलीस शिपायाला सोबत घेऊन सदर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे राज्याच्या एसीबीत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होताच एसपी पाटील १५ दिवसांच्या रजेचा अर्ज देऊन कार्यालयातून निघून गेले. पोलीस पथक त्यांची शोधाशोध करीत असतानाच त्यांनी गुुरुवारी कोर्टात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी वकिलामार्फत अर्ज दिला. आज त्यांना जामीन मिळाला तर, इकडे एसीबी कार्यालयात तातडीचा संदेश आला. त्यानुसार, एसपी पाटील यांची एसीबीच्या मुंबई मुख्यालयात बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त पदावर अमरावती परिक्षेत्राचे एसपी धिवरे यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले. हे आदेश मिळताच धिवरे नागपुरात पोहचले आणि त्यांनी पदभार सांभाळला.