नाग नदी पुनरुज्जीवन परिक्रमा-अंबाझरी ते सीताबर्डी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:54 IST2021-02-05T04:54:02+5:302021-02-05T04:54:02+5:30

नाग नदी पुनरुज्जीवन परिक्रमा-अंबाझरी ते सीताबर्डी नाग नदी खळखळून वाहीलही, पण ती आधी शोधावी लागेल काँक्रिटचा विळखा, उघड्या नदीपात्राची ...

Nag River Revival Parikrama-Ambazhari to Sitabardi | नाग नदी पुनरुज्जीवन परिक्रमा-अंबाझरी ते सीताबर्डी

नाग नदी पुनरुज्जीवन परिक्रमा-अंबाझरी ते सीताबर्डी

नाग नदी पुनरुज्जीवन परिक्रमा-अंबाझरी ते सीताबर्डी

नाग नदी खळखळून वाहीलही, पण ती आधी शोधावी लागेल

काँक्रिटचा विळखा, उघड्या नदीपात्राची कचरापेटी, शेकडो नाले सामावणारी गटारगंगा

गणेश हुड/लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कधी काळी उपराजधानीची जीवनदायिनी असलेल्या नाग नदीचे पुनरुज्जीवन होईल, ती सात-आठ दशकापूर्वीसारखीच खळखळून वाहू लागेल, असे स्वप्न नागपूरकरांनी पाहायला हरकत नाही. परंतु, त्याआधी जागोजागी काँक्रिटखाली गाडली गेलेली, लोकांनी कचरा टाकून टाकून गडप केलेली आणि शेकडो नाल्यांमधून वाहून येणाऱ्या सांडपाण्यामुळे मोठे गटार बनलेली नाग नदी आधी शोधून काढावी लागेल, असेच चित्र लोकमतने गुरुवारी या नदीची पुनरुज्जीवन परिक्रमा सुरू केली तेव्हा दिसून आले.

नाग नदीमुळे राज्याच्या उपराजधानीचे नाव नागपूर पडले की गोंड राजा बख्त बुलंद शाहने १८ व्या शतकात सध्याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील देवगड येथील शाखा येथे आणली व राजधानीचे नागपूर शहर वसवले. तिच्या काठावर आधीच नागवंशाचे लोक राहत असावेत म्हणून त्यांची जीवनदायिनी नदी नाग नावाने ओळखली जाऊ लागली. दावे काहीही असू द्या, नाग नदी पुनरुज्जीवनाच्या घोषणेने शहरवासीयांनी फार हरखून जाण्यासारखी स्थिती नाही. कचरापेटी बनलेल्या नाग नदीला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे, नदीपात्रातील व काठावरील अनधिकृत बांधकामांनी तिचा श्वास कोंडला आहे. तो थोडा मोकळा झाला तरी महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाटाचे आव्हान कसे पेलायचे, ही चिंता आहेच.

शहराच्या पश्चिमेकडील लाव्हा गावाजवळ असलेल्या महादगड डोंगरातून उगम पावलेल्या नाग नदीवर नंतर अंबाझरी तलाव बांधला गेला. १९५६ पर्यंत या नदीत कपडेही धुतले जात. महालातील स्त्रिया हरतालिकेच्या गौरी विसर्जनासाठी नदीवर जात. नदी तोवर स्वच्छ होती. १९५६ मध्ये नाग नदीच्या काठी देखणे बंगले होते. नदीच्या बाजूने डावीकडे अशोकाची झाडे होती.

६०-७० वर्षांपूर्वीचे ते दृश्य आता स्वप्न वाटावे इतके बकाल स्वरूप आता नाग नदीला आले आहे. तिचा कायापालट व्हावा, गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या नदी पुनरुज्जीवन योजनेंतर्गत या प्रकल्पाला काल, बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत मंजुरी दिली. परंतु हा प्रकल्प अडथळ्यांची शर्यत ठरणार आहे.

ते अडथळे असे असतील -

* नदीत मिसळणारे सांडपाणी रोखावे लागेल. नाग नदीला शहर हद्दीतील १७ किलोमीटर प्रवाहात लहान-मोठे २३५ नाले मलमूत्र, सांडपाणी नदीपात्रात आणून सोडतात.

* नदीपात्रात व दोन्ही तीरावर पक्की बांधकामे आहेत. काही इमारती बहुमजली आहेत. तेथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागेल.

* नदीकाठावरील ३५ झोपडपट्ट्या व त्यामध्ये राहणारे सुमारे ३५ हजार लोकांच्या पुनर्वसनाची समस्या मोठी आहे.

....

अंबाझरी ते सीताबर्डी : अधूनमधूनच नदीदर्शन

नाग नदीचे उगमस्थान महादगड डोंगरात असले तरी अंबाझरी तलावातून पुढेच तिला नदीची ओळख आहे. अंबाझरी तलावातून पाझरणाऱ्या पाण्याने प्रवाहित होणारी नाग नदी पुढे नासुप्रच्या जागेत उभारण्यात आलेल्या केझी कॅसलमधून वाहत जाते, नंतर स्केटिंग रिंकसाठी नदीवर स्लॅब टाकण्यात आली आहे. नदी सौंदर्यीकरणात या स्लॅबचाही अडथळा आहेच. त्यापुढे बहुमजली काॅर्पोरेशन कॉलनी, एलएडी कॉलेज, मूकबधिर विद्यालय, शंकरनगर गार्डन, सरस्वती विद्यालयाची इमारत, शंकरनगर पोस्ट ऑफीस अशा अनेक बहुमजली इमारती आहेत. गांधीनगर परिसरातही अशीच परिस्थिती आहे. धरमपेठ एज्युकेशन संस्थेच्या जुन्या इमारतीही नाग नदीलगतच आहेत. सेंट्रल मॉल तर अगदी काठावर आहे. एवढेच नव्हे तर नासुप्र सभापतींचा बंगलाच नदीकाठावर आहे. कॅनाॅल रोडने एका बाजूने नदीकाठावर तर पंचशील चौकात चक्क नदी पात्रावरच अनेक वर्षे जुने बांधकाम आहे. सीताबर्डी भागात बँक ऑफ महाराष्ट्राच्या मागे असलेल्या महादेव मंदिरापर्यंत नदीपात्रावर बांधकामे आहेत. त्यामुळे नदी लुप्त झाली आहे. ही अनेक वर्षे जुनी बांधकामे कशी हटवायची, हा मुद्दा आतापासूनच चर्चेत आला आहे.

Web Title: Nag River Revival Parikrama-Ambazhari to Sitabardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.