सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना धडा शिकविलाच पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 09:02 PM2020-03-03T21:02:10+5:302020-03-03T21:04:15+5:30

सरकारी व सार्वजनिक मालमत्तांवर पोस्टर चिपकवून विद्रुपीकरण करणे, कचरा जाळणे वा रस्त्यांवर बांधकाम साहित्य ठेवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेतला आहे. दोषींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

Must teach a lesson to those who spit in public! | सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना धडा शिकविलाच पाहिजे!

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना धडा शिकविलाच पाहिजे!

Next
ठळक मुद्देउघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना दंड करा कचरा टाकून वा पोस्टर चिपकवून शहर विद्रुप करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराचा स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी महापालिकेने स्वच्छ व सुंदर नागपूर अभियान हाती घेतले आहे. रस्त्यांवर वा कार्यालयांच्या भिंतीवर थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून घाण करणे, सरकारी व सार्वजनिक मालमत्तांवर पोस्टर चिपकवून विद्रुपीकरण करणे, कचरा जाळणे वा रस्त्यांवर बांधकाम साहित्य ठेवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेतला आहे. दोषींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. अशा लोकांना धडा शिकविलाच पाहिजे. प्रशासन आपल्यास्तरावर कारवाई करीत आहे. पण मुंढे यांनीच पुढाकार घ्यावा का? शहरातील नागरिकांचीही तितकीच जबाबदारी आहे. तसेच सामाजिक संघटना कुठे गेल्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहर स्वच्छ ठेवायचे असेल तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना आळा घालावाच लागेल. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने आजवर थुंकणाऱ्या ३,३८१ लोकांवर कारवाई करून ५ लाख २९ हजारांचा दंड वसूल केला. परंतु अजूनही अशाप्रकाराला आळा बसलेला नाही.
खर्रा, पान वा तंबाखू खाणारे वाहन चालविताना चौकात, रस्त्यावर वा सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. यामुळे सर्वत्र घाण होते, सोबतच यातून संसर्गजन्य आजारही होण्याचा धोका असतो. एवढेच नव्हे तर कार्यालयाच्या भिंतीवर, शौचालय, मूत्रीघरात थुंकून घाण करतात. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. यासाठी नागरिकांनीही पुढे येण्याची गरज आहे.
उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची कमी नाही. रस्त्याच्या कडेला वा झाडांच्या आडोशाने लघुशंका करून घाण पसरविली जाते. शहरात जागोजागी मूत्रीघर आहेत, परंतु त्याचा वापर केला जात नाही. उघड्यावर लघुशंका करणाºया २,१८४ लोकांवर उपद्रव शोध पथकाने कारवाई करून ५ लाख ५७ हजारांचा दंड वसूल केला. परंतु अशाप्रकाराला आळा बसलेला नाही. उघड्यावर लघुशंका केल्याने आजार फैलण्याचा धोका असतो. प्रशासनाकडून कारवाई केल्याने हा प्रकार थांबणार नाही. यासाठी सेवाभावी संस्था, जागरूक नागरिक यांनीही यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याशिवाय शहर स्वच्छ होणार नाही

मुतारीच्या बाजूला लघुशंका
शहरात ठिकठिकाणी मुतारी उभारण्यात आल्या आहेत. परंतु अनेकजण मुतारीचा वापर न करता मुतारीच्या बाजूला उघड्यावर लघुशंका करतात. यामुळे रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या महिलांची कुचंबणा होते. या प्रकाराला आळा बसला पाहिजे. उघड्यावर लघुशंका करणाºयांना रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

फूटपाथचा लघुशंकेसाठी वापर
शहरातील रहदारीला अडथळा होऊ नये यासाठी पादचाऱ्यांसाठी फूटपाथ निर्माण करण्यात आले आहेत. परंतु या फूटपाथवर लघुशंका करणाऱ्यांची कमी नाही. चौकाच्या बाजूला वा बाजार भागात काही ठिकाणी फूटपाथवर लघुशंका केली जाते. यामुुळे परिसरात घाण पसरते. आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. याला आळा घालण्याची गरज आहे.

पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई व्हावी
सार्वजनिक ठिकाणी पोस्टर, बॅनर लावून शहर विद्रूप करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची कायद्यात तरतूद असतानाही असामाजिक तत्त्वांकडून शहर विदु्रपीकरणाचे प्रकार सुरूच आहेत. शहरातील मेट्रो रेल्वेच्या पिल्लरवर पोस्टर चिटकवून विद्रूप केले जात आहे. मनपा प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी विदु्रपीकरण करणाऱ्यांना शिक्षा व्हावी, यासाठी अशी मनपा कायद्यात तरतूद करण्याची गरज आहे.

 

 

Web Title: Must teach a lesson to those who spit in public!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.