नागपुरात मुस्लिम लीग-राष्ट्रवादीची युती

By Admin | Updated: January 15, 2017 16:10 IST2017-01-15T16:10:52+5:302017-01-15T16:10:52+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस व मुस्लिम लिगची युती झाल्याची घोषणा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख व मुस्लिम लिगचे शहर अध्यक्ष शमीम सादिक यांनी

Muslim League-NCP alliance in Nagpur | नागपुरात मुस्लिम लीग-राष्ट्रवादीची युती

नागपुरात मुस्लिम लीग-राष्ट्रवादीची युती

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 15 -  राष्ट्रवादी काँग्रेस व मुस्लिम लिगची युती झाल्याची घोषणा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख व मुस्लिम लिगचे शहर अध्यक्ष शमीम सादिक यांनी रविवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. आता रिपब्लिकन गटांनाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. 
देशमुख म्हणाले, कुणाला किती जागा द्यायच्या यावर आमची अद्याप चर्चा झाली नाही. यानंतर पुढील बैठकीत जागावाटप निश्चित केले जाईल. धर्मांध शक्तीविरोधात लढण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस हा आमचा मोठा भाऊ आहे. या लढ्यात काँग्रेसनेही सोबत यावे, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे काँग्रेसनेही सकारात्मक विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. 

 मुस्लिम लिगचे शहर अध्यक्ष शमीम सादिक म्हणाले, महापालिकेची गेली निवडणूक लिगने स्वबळावर लढविली होती. आम्ही भाजपाला महापालिकेत समर्थन दिले नव्हते. मुस्लिम बहुल भागाचा विकास करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, गेल्या पाच वर्षात भाजपने विकास कामे केली नाहीत. भाजपने शब्द पाळला नाही. त्यामुळे या वेळी आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.  
काँग्रेसने आधी नेत्यांचे मनोमिलन करावे 
 राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतरही काँग्रेसने आघाडी नको, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत विचारले असता आ. प्रकाश गजभिये म्हणाले, काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते विलास मुत्तेमवार यांच्याघरी चर्चेसाठी गेले. काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिला. मात्र, दुसºयाच दिवशी काँग्रेसच्या इतर नेत्यांचे फोन आले. कोणताही एक नेता आघाडीचा निर्णय घेणार नाही. आमच्याशीही चर्चा करावी लागेल, असे त्या नेत्यांचे म्हणणे होते, असे गजभिये यांनी सांगितले. त्यामुळे  काँग्रेसने राष्ट्रवादीला नकार देण्यापेक्षा आधी आपल्या नेत्यांचे मनोमिलन करावे, असा चिमटा आ. प्रकाश गजभिये यांनी काढला.

Web Title: Muslim League-NCP alliance in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.