नागपुरात अनोळखी तरुणाची हत्या : डोक्यावर ठेचून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:15 IST2020-05-28T21:14:20+5:302020-05-28T21:15:55+5:30

निर्जन ठिकाणी नेऊन एका अनोळखी तरुणाची अज्ञात आरोपींनी हत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पारडी परिसरात एकच खळबळ उडाली.

Murder of an unidentified youth in Nagpur: He was crushed on the head | नागपुरात अनोळखी तरुणाची हत्या : डोक्यावर ठेचून मारले

नागपुरात अनोळखी तरुणाची हत्या : डोक्यावर ठेचून मारले

ठळक मुद्देपारडीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निर्जन ठिकाणी नेऊन एका अनोळखी तरुणाची अज्ञात आरोपींनी हत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पारडी परिसरात एकच खळबळ उडाली.
भंडारा मार्गावरील कापसी पुलाजवळच्या मोकळ्या जागेत चिंचेच्या झाडाखाली रक्ताच्या थारोळ्यात एका तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती पारडी पोलिसांना गुरुवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास मिळाली. त्यावरून ठाणेदार सुनील चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रियांका गोदमले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. मृत तरुणाच्या डोक्याखाली रक्ताचे थारोळे साचले होते आणि बाजूलाच रक्ताने भरलेली सिमेंटची वीट पडून होती. त्यामुळे त्या विटेने ठेचून त्या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. तरुणाच्या कपड्याची तपासणी केली असता त्याची ओळख पटविणारे कोणतेही कागदपत्र पोलिसांना मिळाले नाही. बाजूला देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या पडून होत्या. त्यामुळे मृत आणि त्याला मारणारे आरोपी तेथे बसून दारू प्यायले असावे. दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाला असावा आणि त्यामुळे त्यांनी या तरुणाची हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे. याप्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मृताची ओळख पटविण्याचा तसेच त्याची हत्या कुणी केली, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.

अत्याचाराचा प्रयत्न?
मृत तरुणाचा पँट गुडघ्यापर्यंत खाली होता. त्यामुळे त्याच्यासोबत आरोपींकडून अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला असावा, अशी चर्चा अन् संशय आहे.

Web Title: Murder of an unidentified youth in Nagpur: He was crushed on the head