सिगारेटचे पैसे मागितल्याने तलवारीने वार करून खून; दिवसाढवळ्या थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2023 22:23 IST2023-07-01T22:23:28+5:302023-07-01T22:23:54+5:30

Nagpur News सिगारेटचे पैसे मागितल्यामुळे संतप्त झालेल्या गुंडाने दिवसाढवळ्या तलवारीने वार करून किराणा दुकानदाराचा खून केला. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुदामनगरी नरसाळा रोड येथे घडली.

Murder by sword for demanding money for cigarettes; Daylight thrills | सिगारेटचे पैसे मागितल्याने तलवारीने वार करून खून; दिवसाढवळ्या थरार

सिगारेटचे पैसे मागितल्याने तलवारीने वार करून खून; दिवसाढवळ्या थरार

नागपूर : सिगारेटचे पैसे मागितल्यामुळे संतप्त झालेल्या गुंडाने दिवसाढवळ्या तलवारीने वार करून किराणा दुकानदाराचा खून केला. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुदामनगरी नरसाळा रोड येथे घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

गणेश रमेश पानकावसे (३८, रा. सुदामनगरी, हुडकेश्वर) असे खून झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. तर पंकज दिगांबर टोंग (३५, रा. प्लॉट नं. ८१, प्रभातनगर, नरसाळा) असे आरोपीचे नाव आहे. गणेश पानकावसे यांचे किराणा दुकान आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि ९ वर्षांचा मुलगा आणि मुलगी अशी दोन जुळी मुले आहेत. गणेश यांच्याकडे त्यांची भाची सिया (वय १४) ही लहानपणापासून शिकायला आहे. गणेश यांच्या घरासमोर काही अंतरावर नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. गुरुवारी आरोपी पंकज हा त्यांच्या दुकानात आला. त्याने सिगारेटचे पाकीट विकत मागितले. त्याने पाकिटाचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे दुकानात त्यांचे भांडण झाले. त्यावेळी आरोपी पंकज त्यांना धमकी देऊन तेथून निघून गेला होता.

शनिवारी दुपारी तीन वाजता गणेश हे बाजूला सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी गेले. यावेळी आरोपी पंकज त्यांच्या मागोमाग गेला. गणेश हे बेसावध असताना आरोपीने त्यांच्यावर तलवारीने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. आरोपी फरार झाल्यानंतर जखमी गणेश यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. हुडकेश्वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी पंकज टोंग याला अटक केली आहे.

 

..................

Web Title: Murder by sword for demanding money for cigarettes; Daylight thrills