मुंबई फास्ट आणि महाराष्ट्र सुपरफास्ट हेच आमचे मिशन; कर्जमाफी करणारच, विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 'बॅटिंग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:52 IST2025-12-15T11:51:54+5:302025-12-15T11:52:08+5:30
विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबई फास्ट आणि महाराष्ट्र सुपरफास्टचा नाराच दिला.

मुंबई फास्ट आणि महाराष्ट्र सुपरफास्ट हेच आमचे मिशन; कर्जमाफी करणारच, विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 'बॅटिंग'
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबई फास्ट आणि महाराष्ट्र सुपरफास्टचा नाराच दिला. परिषदेच्या 'पिच'वर सरकारच्या विकासकामांवर बोलत असताना निवडणुकीवर आधारित मुद्द्यांवर त्यांनी जोरदार 'बॅटिंग' केली.
उद्धवसेनेवर वारंवार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रहार करत त्यांनी अनेकदा चिमटे काढले. विशेषतः महायुतीच निवडणुकीत धुरंधर ठरेल, असा दावा करत मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रहमान डकैत' कोण आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच पायाभूत सुविधांसाठी केलेल्या कामांवर भाष्य केले. शेतकऱ्यांच्या खात्यात १५ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. आम्ही कर्जमाफीचा शब्द दिला होता व काहीही झाले तरी आम्ही तो पाळणारच. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी संकटात असताना राजकारण बाजूला सारून सगळ्यांनी एकत्रित मदत केली पाहिजे, असे शिंदे म्हणाले.
परिषदेत दिसला 'धुरंधर इफेक्ट'
यावेळी शिंदे यांनी मुंबईच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या 'रहमान डकैत'चा शोध घेतला पाहिजे. इतिहासात अनेक रहमान डकैत आले. मात्र, अशा लोकांना पाणी पाजणारी महायुती 'धुरंधर' आहे, असे शिंदे म्हणाले. महायुती अभेद्य असून पुढील निवडणुका सोबतच लढवू असा दावाही त्यांनी केला.
मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही?
काही लोक वारंवार मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आमचा डाव असल्याचे आरोप करतात. मात्र कुणीही 'माई का लाल' मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. मुंबई महाराष्ट्राचे हृदय आहे. मुंबईतील लोकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त योजनापुष्प अर्पण करण्यात येईल, असे शिंदेंनी स्पष्ट केले.
राजकीय प्रदूषण हटविणार
शिंदे यांनी सरकारच्या कामगिरीसोबतच उद्धवसेनेला अनेकदा चिमटे काढले. मुंबईत जल व वायुप्रदूषण कमी करण्यावर भर आहेच. शिवाय राजकीय प्रदूषणही आम्ही हटवू. मी मुख्यमंत्री झाल्यापासून अनेकांना पोटदुखी सुरू झाली आहे. मात्र माझा अजेंडा खुर्ची हा नाही. मुंबई स्वच्छ करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. मात्र हे मुख्यमंत्र्यांचे काम नाही, असे काही लोक म्हणाले. मग मुख्यमंत्र्यांचे काम घरी बसायचेच असते का, असा टोला शिंदे यांनी लगावला.