जगात आनंदी राहण्यासारखे सोपे काम दुसरे कोणतेच नाही; मोटिवेशनल स्पीकर शांतिलाल गुलेचा यांनी साधला ‘लोकमत’शी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 04:11 IST2025-05-15T04:11:17+5:302025-05-15T04:11:46+5:30
‘शानदार शांतिभाई’ या नावाने गुलेचा हे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत.

जगात आनंदी राहण्यासारखे सोपे काम दुसरे कोणतेच नाही; मोटिवेशनल स्पीकर शांतिलाल गुलेचा यांनी साधला ‘लोकमत’शी संवाद
फहीम खान, लोकमत न्यूज नेटवर्क , नागपूर : मोकलसर (राजस्थान) येथील मूळ रहिवासी आणि सध्या मुंबईत राहणारे मोटिवेशनल स्पीकर शांतिलाल गुलेचा यांनी तयार केलेला व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झालेला आहे. फेसबुकवर तो दोन कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला.
‘शानदार शांतिभाई’ या नावाने गुलेचा हे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. एखादी व्यक्ती खानदानी आहे की नाही, हे त्याचे वर्तन पाहूनच कळू शकते, हे मजेशीर अंदाजात सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या व्हिडीओत केला आहे. याबाबत ‘लोकमत’ ने गुलेचा यांच्याशी संवाद साधला. या जगात आनंदी राहण्यासारखं सोपं काम दुसरं कोणतंच नाही, पण त्यासाठी काही उपाय केले पाहिजेत, असे ते सांगतात.
आपण व्हिडीओ बनवण्याची सुरुवात कशी झाली?
मी टेक्स्टाइल आणि मायनिंग व्यवसाय करतो. व्हिडीओ हे माझे पॅशन आहे. अनोळखी लोक भेटल्यानंतर ते सांगतात की, तुमचा व्हिडीओ पाहून आम्ही मनमोकळे हसतो, तेव्हा मला समाधान मिळते. कोरोना काळात वाटलं की, व्हिडीओतून लोकांच्या आयुष्यात आनंद भरता येईल. मग मी हसविणारे व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. आतापर्यंत ८०० व्हिडीओ बनवले आहेत.