चाळीस दिवसाचे बाळ घेऊन आई गावाच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 13:07 IST2020-05-20T13:07:15+5:302020-05-20T13:07:48+5:30
दुचाकीवर दोन्ही बाजूंना खच्चून बांधलेल्या सामान्यांच्या पिशव्या, अडीच आणि साडेचार वर्षांची दोन लहान मुले आणि पदरात अवघ्या चाळीस दिवसाचे कोवळे बाळ घेऊन आलेल्या एका थकल्याभागल्या कुटुंबाने सर्वांनाच सुन्न करून सोडले.

चाळीस दिवसाचे बाळ घेऊन आई गावाच्या वाटेवर
गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीवर दोन्ही बाजूंना खच्चून बांधलेल्या सामान्यांच्या पिशव्या, अडीच आणि साडेचार वर्षांची दोन लहान मुले आणि पदरात अवघ्या चाळीस दिवसाचे कोवळे बाळ घेऊन आलेल्या एका थकल्याभागल्या कुटुंबाने सर्वांनाच सुन्न करून सोडले. विजयवाडा (आंध्र प्रदेश) ते गोरखपूर (उत्तर प्रदेश) अशा सतराशे किलोमीटर प्रवासाला दुचाकीवर निघालेल्या या कुटुंबाला पाहून सारेच हळहळले.
सोमवारी १८ मेच्या रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडलेला हा प्रसंग! बुटीबोरी ते नागपूरदरम्यान जामठा गावाजवळ असलेल्या दीनबंधू संस्थेच्या मदत केंद्रावर एक बाईक थांबली. या बाईकवर सर्व बाजूंनी पिशव्या लटकलेल्या. सोबत सुमारे अडीच आणि साडेचार वर्षे वयाची दोन मुले व अवघ्या एक महिना दहा दिवसाच्या तान्हुल्याला घेऊन ही माता बाईकवरून उतरली. लांबच्या प्रवासाने सर्वांचीच अवघडलेली अवस्था आणि थकून गेलेली ती माउली बघून उपस्थितांचे हृदय हेलावले.
दिलीपकुमार प्रजापती आणि त्याची पत्नी चंदा प्रजापती असे या जोडप्याचे नाव. सुतारकीचा व्यवसाय असल्याने दिलीपने गोरखपूर सोडले आणि काही वर्षापूर्वी आंध्र प्रदेशातील विजयवाडा गाठले. तेथे एका कंत्राटदाराकडे सुतारकीचा व्यवसाय सुरू केला. दोन मुले झाली. कष्टाच्या रोजीवर संसार सुखाचा सुरू होता. अशातच मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. पत्नी चंदा तिसऱ्यांदा गर्भवती होती. दिवस भरल्याने एप्रिल महिन्यात तिने बाळाला जन्म दिला. लॉकडाऊनमुळे हातचे काम सुटलेले. हाताला काम नसल्याने घरात पैसा नाही. कुटुंबात बाळाचा जन्म झालेला. पत्नीच्या बाळंतपणाचा आणि औषध पाण्यासाठी खर्च आ वासून उभा राहिलेला. अशातही त्याने बाहेर काम शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु घरमालकाने कोरोनाच्या भीतीने बाहेर काम करण्यास स्पष्ट नकार दिला. पैसा हातात नसल्याने घरभाडे देता आले नाही. घरमालकाने किरायाचा तगादा लावला. परका मुलूख, परकी माणसे! या कठीण दिवसात मदतीला तरी कोण येणार? शेवटी नाईलाजाने या जोडप्याने उत्तर प्रदेशातील गोरखपूरजवळच्या पादरी बाजार या आपल्या जन्मगावी जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासासाठी त्यांनी रेल्वेचा पर्याय शोधून पहिला. परंतु तिकीट मिळाले नाही. कारण आधार कार्ड जवळ नव्हते. शेवटी त्यांनी निर्णय पक्का केला. बाईकवर गावाकडे जाण्याचे ठरवले. दोन लहान मुले, एक नवजात बाळ आणि पत्नीला सोबत घेऊन अख्ख्या बिºहाडासह तो बाईकवर गावाकडे निघालाय.
बाळ गुंडाळले होते फाटक्या कपड्यात
या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट होती की चाळीस दिवसाच्या या बाळाला दुचाकीवरून प्रवासात नेण्यासाठी पुरेसे कपडेही नव्हते. घरीच असलेल्या साडीच्या एका फाटक्या कापडामध्ये या बाळाला गुंडाळून ही माउली आपल्या पदराआड सांभाळत होती. दोन लहान मुले आणि कुशीत बाळ घेऊन आयुष्याचा तोल सांभाळत निघालेल्या या माउलीची धडपड डोळ्यात पाणी आणणारी होती.
अन् चंदाचे डोळे डबडबले!
दीनबंधू या सामाजिक संस्थेकडून सुरू असलेल्या सेवार्थ अन्नछत्रावर हे कुटुंब पोहोचले असता तेथील स्वयंसेवकांनी या कुटुंबाला जेवण दिले. निघताना सोबत फळे, फराळ, बिस्किटे, ग्लुकोजही बांधून दिले. या ओल्या बाळंतिणीच्या हाती माहेरचे कर्तव्य समजून पैशाचे पॅकेट ठेवले. ही आपुलकी आणि प्रेम बघून चंदाचे डोळे डबडबून आले.