शाळेत जाण्यासाठी आईने रागावले, नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By नरेश डोंगरे | Updated: February 26, 2023 20:40 IST2023-02-26T20:40:39+5:302023-02-26T20:40:46+5:30
नागपूर : शाळेत जाण्याच्या कारणावरून आईने रागाविल्याच्या कारणावरून एका नववीतील विद्यार्थिनीने घरी आत्महत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही ...

शाळेत जाण्यासाठी आईने रागावले, नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
नागपूर : शाळेत जाण्याच्या कारणावरून आईने रागाविल्याच्या कारणावरून एका नववीतील विद्यार्थिनीने घरी आत्महत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकारामुळे तिचे कुटुंबिय प्रचंड धक्क्यात आहेत.
नंदिनी महेश लांजेवार (१५) असे मृतक मुलीचे नाव आहे. नंदिनी ही सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी होती. २१ फेब्रुवारी रोजी तिच्या आईने तिला शाळेत जाण्याच्या मुद्द्यावरून रागावले. तसेच परीक्षा जवळ आली असल्याने अभ्यास करण्याबाबतदेखील म्हटले. यावरून नंदिनी संतापली. दुपारी एक वाजताच्या सुमारास कुणाचेही लक्ष नाही हे पाहून संतापाने तिने घरीच कॅनॉन नावाचे विषारी औषध प्राशन केले.
त्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती खराब झाली. तिने आईवडिलांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला तातडीने नंदनवन येथील एका इस्पितळात दाखल करण्यात आले. तिच्यावर चार दिवस उपचार चालले. मात्र अखेर रविवारी रात्री २.१० वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूमुळे तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. तिला एक लहान बहीण असूनदेखील तीदेखील मानसिक धक्क्यात आले. तिच्या वडिलांच्या सूचनेवरून कळमना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.