डासांमुळे होणारे बहुतेक मृत्यू हे मेंदूच्या गंभीर आजारांमुळे
By सुमेध वाघमार | Updated: July 24, 2025 18:33 IST2025-07-24T18:31:40+5:302025-07-24T18:33:15+5:30
डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिला धोक्याचा इशारा : हवामान बदलामुळे डासांच्या आजारात वाढ

Most deaths from mosquitoes are due to serious brain diseases.
सुमेध वाघमारे
नागपूर: डास हे केवळ त्रासदायक नसून, दरवर्षी लाखो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारे जगातील सर्वात प्राणघातक जीव आहेत. विशेषत:, डासांमुळे होणारे बहुतेक मृत्यू हे मेंदूच्या गंभीर आजारांमुळे होतात, अशी धक्कादायक माहिती वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त, पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली. जागतिक न्यूरोलॉजी फेडरेशनच्या १२ व्या जागतिक मेंदू दिनानिमित्त 'लोकमत'शी बोलताना त्यांनी डासांमुळे वाढलेल्या आरोग्य संकटावर प्रकाश टाकला.
डॉ. मेश्राम यांच्या म्हणण्यानुसार, एकेकाळी उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामानापुरते मर्यादित असलेले झिका, डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे आजार पसरवणारे एडीस डास, आता हवामान बदल, लोकसंख्या वाढ, वाढता प्रवास आणि शहरीकरणामुळे नवीन प्रदेशांमध्ये वेगाने पसरत आहेत. यामुळे या आजारांच्या उद्रेकाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या डासांमधील आर्बोव्हायरस हा सार्वजनिक आरोग्यासाठी एक मोठा धोका बनला असून, यामुळे सध्या जगभरातील ५.६ अब्जाहून अधिक लोक धोक्यात आले आहेत. एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, पुनरुत्पादन काळात उच्च प्रथिनांची आवश्यकता असल्याने केवळ मादी डासच मानवांना चावतात.
या वर्षात चिकुनगुनियाचे ३०,८७६ रुग्ण
आशिया, आफ्रिका, युरोप आणि अमेरिकेतील ६० हून अधिक देशांमध्ये चिकनगुनियाचा प्रादुर्भाव दिसून येतो. भारतात २००६ नंतर दरवर्षी सुमारे २० हजार ते ६० हजार रुग्ण आढळत आहेत. धक्कादायक म्हणजे, २०२५ मध्ये आत्तापर्यंतच देशात ३० हजार ८७६ चिकनगुनियाचे रुग्ण नोंदवले गेले आहेत. हा आजार मूळचा भारतीय आहे. चिकनगुनियामुळे १० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो तर, ४० टक्के मुले कायमच्या अपंगत्वाने ग्रस्त होतात. यावर कोणताही विशिष्ट औषधोपचार उपलब्ध नाही.
जागतिक पातळीवर डेंग्यूवर ३० पटीने वाढ
गेल्या ३० वर्षांत जगभरात डेंग्यूचा प्रादुर्भाव ३० पटीने वाढला आहे. १२९ हून अधिक देशांमध्ये डेंग्यू हा एक स्थानिक आजार बनला असून, ३.९ अब्ज लोकांना डेंग्यूचा धोका आहे. जगात दरवर्षी ७० ते १५० दशलक्ष रुग्ण आढळतात, त्यापैकी ५ लाख रुग्ण गंभीर अवस्थेत पोहोचतात. पॅन अमेरिकन फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजिकल सायन्सेसचे माजी अध्यक्ष, होंडुरास येथील डॉ. मार्को मेडिना यांनी सांगितले की, ४ ते ५ टक्के डेंग्यूच्या रुग्णांमध्ये एन्सेफलायटीस, मेंदुज्वर, गुलेन बॅरे सिंड्रोम, स्नायू आणि पाठीच्या कण्यातील त्रासासारखे न्यूरोलॉजिकल आजार दिसून येतात. यावर कोणताही विशिष्ट उपचार सध्या उपलब्ध नाही.
मलेरियाचा गुंतागुंतीचा धोका ५ वर्षांखालील मुलांना अधिक
आफ्रिकन अकादमी आॅफ न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. लॉरेन्स टकर यांच्या मते, २०२३ मध्ये मलेरियाचे अंदाजे २६३ दशलक्ष रुग्ण होते आणि मलेरियामुळे होणाºया मृत्यूंची संख्या ५ लाख ९७ हजार होती. मलेरियामुळे होणाºया गंभीर गुंतागुंतीचा धोका ५ वर्षांखालील मुलांना सर्वाधिक असतो. यात २० टक्के रुग्ण मृत्यू पावतात, तर ४० टक्के मुलांना विकृती आणि झटके येतात.