मोर्शी-नागपूर एसटीचे चाक निखळले, प्रवासी थोडक्यात वाचले, नागझिरी फाट्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 14:49 IST2023-01-29T14:47:53+5:302023-01-29T14:49:49+5:30
चालकाच्या सतर्कतेने या अपघातातून प्रवाशी थोडक्यात बचावले. ही घटना रविवारी साडेसहा वाजता घडली.

मोर्शी-नागपूर एसटीचे चाक निखळले, प्रवासी थोडक्यात वाचले, नागझिरी फाट्यावरील घटना
वरूड : मोर्शी-वरुड राष्ट्रीय महामार्गावरून मोर्शी ते नागपूर जाणाऱ्या एसटी बस (एमएच ४० एन ९९६६) चे नागझिरी फाट्याजवळ अचानक ॲक्सेल तुटल्याने चालकाच्या बाजूचे मागील चाक निखळून शेतात पडले. चालकाच्या सतर्कतेने या अपघातातून प्रवाशी थोडक्यात बचावले. ही घटना रविवारी साडेसहा वाजता घडली.
मोर्शी आगाराची ही बस सकाळी ६ वाजता नागपूरकडे निघाली होती. तालुक्यातील बेनोडानजीक नागझिरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर बसचे मागील चाक निखळून शेतात पडले. बसमध्ये यावेळी १५ प्रवासी होते. हा अपघात किरकोळ जखमांवर निभावला. सकाळी वाहतूक कमी असल्याने अन्य कोणत्याही वाहनाची धडक लागली नाही. चालकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला.
एसटी बसच्या देखभालीकडे दुर्लक्ष
एसटी महामंडळाचे देखभालीकडे दुर्लक्ष असल्याने एसटी बसच्या अपघातात वाढ होत असल्याचे चित्र असून हा प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्याने प्रवाशांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.
मोठा आवाज अन् प्रवाशांची घाबरगुंडी
एसटी बसचे चाक निखळल्यानंतर मोठा आवाज होऊन चाक नजीकच्या शेतात घरंगळत गेले. त्यामुळे आती प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. तथापि, चालकाने प्रसंगावधान राखत एसटी रस्त्याच्या मधोमध थांबवली.