वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू
By दयानंद पाईकराव | Updated: June 20, 2023 15:47 IST2023-06-20T15:47:10+5:302023-06-20T15:47:41+5:30
मातोश्री कामनापूरे विद्यालयाजवळील घटना

वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू
नागपूर : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ५२ वर्षाच्या व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी १९ जूनला पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडली. लक्ष्मण किसनराव ढगे (वय ५२, रा. नगर परिषदेच्या बाजुला, हिंगणा रोड, वानाडोंगरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते सकाळी ५.३० वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेले होते.
मातोश्री कामनापूरे विद्यालयाजवळ अज्ञात वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून लक्ष्मण यांना जोरदार धडक देऊन पळून गेला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांचा मुलगा रवि लक्ष्मण ढगे (वय ३२) यांनी दिलेल्या सुचनेवरून एमआयडीसी ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश चांदेकर यांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम ३०४ (अ), २७९, सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.