शालार्थ आयडी घोटाळ्यात दीडशेहून अधिक संस्थांचे ‘कनेक्शन’, प्रत्येक संस्थेची सखोल चौकशी सुरू
By योगेश पांडे | Updated: May 27, 2025 23:45 IST2025-05-27T23:44:32+5:302025-05-27T23:45:14+5:30
आतापर्यंत आढळले ६२९ बोगस आयडी : वंजारी, जामदार यांच्या चौकशीतून अनेकांची पोलखोल

शालार्थ आयडी घोटाळ्यात दीडशेहून अधिक संस्थांचे ‘कनेक्शन’, प्रत्येक संस्थेची सखोल चौकशी सुरू
योगेश पांडे
नागपूर : संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात ‘एसआयटी’कडून वेगाने तपास सुरू आहे. अटकेत असलेल्या नागपूर शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक व छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार तसेच नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांच्या सखोल चौकशीतून या घोटाळ्यात आणखी अधिकाऱ्यांची नावे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत या घोटाळ्यात दीडशेहून अधिक शैक्षणिक संस्थांचे ‘कनेक्शन’ समोर आले आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती पूर्व विदर्भासोबतच इतर ठिकाणीदेखील आहे का याचा एसआयटीकडून तपास सुरू आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एसआयटीने २०१० पासूनच्या शालार्थ आयडीसंदर्भात तपास केला. नागपूर जिल्ह्यात जवळपास अकराशे प्रस्ताव तयार झाले होते. मात्र त्यातील केवळ साडेतीनशेच शालार्थ आयडीचे प्रस्ताव पडताळणी समितीकडे गेले. त्यांची छाननी झाली व ते अधिकृत ठरले. आतापर्यंतच्या तपासात ६२९ शालार्थ आयडी बोगस असल्याचे आढळून आले आहे. जवळपास दीडशे शिक्षणसंस्थांच्या शिक्षकांचे हे आयडी होते. त्या संस्थांचीदेखील चौकशी सुरू झाली आहे.
आरोपींची संख्या आणखी वाढणार
दरम्यान, एसआयटीने वंजारी, जामदार यांच्यासोबतच लिपिक मंघामचीदेखील सविस्तर चौकशी केली. शालार्थ आयडी तयार करणे, शासकीय नियुक्ती मिळणे व वेतन काढणे अशी ही प्रक्रिया होती. शिक्षणाधिकाऱ्यांकडून उपसंचालक कार्यालय व तेथून पडताळणी समितीकडे प्रस्ताव जाणे अभिप्रेत होते. मात्र आतापर्यंत ६२९ शालार्थ आयडी हे प्रस्ताव समितीकडे न पाठविता थेट जारी झाल्याची बाब समोर आली आहे. यात उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांसोबतच काही निरीक्षक, लिपिक, अधीक्षक यांचादेखील समावेश असल्याचे आढळले आहे. या सर्वांवर एसआयटीकडून कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.
नीलेश वाघमारे फरारच
दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेला वेतन विभाग अधीक्षक नीलेश वाघमारे हा फरारच आहे. त्याचा एसआयटीकडून शोध घेण्यात येत आहे. त्याने अगोदर पोलिसांना गुंगारा दिला होता. तो गोव्यात लपल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याची बाब एसआयटीतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे. त्याला लपण्यास मदत करणाऱ्यांवरदेखील कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.