राज्याच्या एकूण साठवण क्षमतेच्या निम्म्याहून अधिक पाणी प्राणहितामधून समुद्राकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 21:33 IST2020-10-29T21:31:16+5:302020-10-29T21:33:10+5:30
Total storage water capacity goes from Pranhita to sea महाराष्ट्रातील सगळ्या धरणांची जितकी पाणी साठवण क्षमता आहे, त्याच्या निम्म्याहून अधिक पाणी केवळ यंदाच्या पावसाळ्यात विदर्भातून प्राणहिता नदीतून गोदावरीमार्गे बंगालच्या उपसागराला वाहून गेले, असे स्पष्ट झाले आहे.

राज्याच्या एकूण साठवण क्षमतेच्या निम्म्याहून अधिक पाणी प्राणहितामधून समुद्राकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील सगळ्या धरणांची जितकी पाणी साठवण क्षमता आहे, त्याच्या निम्म्याहून अधिक पाणी केवळ यंदाच्या पावसाळ्यात विदर्भातून प्राणहिता नदीतून गोदावरीमार्गे बंगालच्या उपसागराला वाहून गेले, असे स्पष्ट झाले आहे.
परतीच्या पावसाने मराठवाडा तसेच दक्षिण महाराष्ट्राच्या अनेक भागांना गेल्या आठवड्यात तडाखा दिला. अतिवृष्टीने झालेल्या हानीचे पंचनामे व राज्य सरकारने जाहीर केलेल्या १० हजार कोटीच्या पॅकेजमधील मदत वाटपाचे काम सुरू असताना गेल्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पूर्व विदर्भात अतिवृष्टीने झालेल्या अशाच नुकसानीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या भागात जवळपास ९० हजार हेक्टर शेतीला अतिपावसाचा तडाखा बसला. वन कायद्याचा अडथळा असल्याने या भागात गोसेखुर्द वगळता मोठी धरणे नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महापुराचे पाणी गोदावरीची उपनदी प्राणहितामधून समुद्रात वाहून गेले.
१२०० टीएमसी पाणी बंगालच्या उपसागरात वाहून गेले
जलसंपदा विभागातील सूत्रांच्या मते, एरव्ही उशिरा दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीला यंदा मराठवाड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे थोडा लवकर पूर आला. त्यानंतर ऑगस्टच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे वर्धा, पैनगंगा, वैनगंगा या विदर्भातील प्रमुख नद्या आणि त्या सगळ्यांची मिळून बनलेली प्राणहिता यामधून जवळपास १००० ते १२०० अब्ज घनफूट (टीएमसी) इतके पाणी बंगालच्या उपसागरात वाहून गेले.
- महाराष्ट्रात छोटी-मोठी मिळून ३ हजार २६४ धरणे आहेत.
- त्यांची एकूण साठवण क्षमता १७२० टीएमसी इतकी आहे.
- याचा अर्थ पूर्व विदर्भातून राज्याच्या एकूण साठाक्षमतेच्या निम्म्याहून अधिक पाणी समुद्रात वाहून गेले.