नागपूरच्या मेडिकलमध्ये आले हाडांच्या चाचणीकरिता अद्ययावत ‘डेक्सा स्कॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:14 IST2017-12-06T00:13:32+5:302017-12-06T00:14:25+5:30
हाडांच्या रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेले ‘डेक्सा स्कॅन’ उपकरण सोमवारपासून मेडिकलमध्ये सेवेत दाखल झाले आहे.

नागपूरच्या मेडिकलमध्ये आले हाडांच्या चाचणीकरिता अद्ययावत ‘डेक्सा स्कॅन’
आॅनलाईन लोकमत
नागपूर : बदलत्या जीवनशैलीमुळे हाडांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यात महिलांसोबत पुरुषांमध्येही ‘आॅस्टिओपोरोसिस’ चे प्रमाण मोठे आहे. अशा रुग्णांमध्ये ‘हिप फ्रॅक्चर’ केव्हाही होऊ शकते. ‘डेक्सा स्कॅन’ या चाचणीद्वारे हाताची दोन्ही मनगटे, कंबरेचे हाड, पाठीचा कणा या सांध्याच्या मजबुतीची माहिती करून घेता येते. हाडांच्या रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेले ‘डेक्सा स्कॅन’ उपकरण सोमवारपासून मेडिकलमध्ये सेवेत दाखल झाले आहे.
तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेले ‘डेक्सा स्कॅन’ म्हणजेच ‘ड्युअल एनर्जी एक्सरे अॅब्लॉस्प्रिओमिटरी’. या उपकरणामुळे आता एका क्लिकवर हाडांची घनता मोजणे शक्य झाले आहे. मेडिकलमधील मेडिसीन विभागाच्या अपघात विभागात सोमवारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या उपस्थितीत हे उपकरण सेवेत दाखल झाले. यावेळी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. योगेंद्र बन्सोड उपस्थित होते. या अद्ययावत निदान उपकरणामुळे आॅस्टिओपॅनिया, आॅस्टिओपोरोसिस आणि रजोनिवृत्तीमुळे हाडांची घनता कमी होणाऱ्या रुग्णांची सोय होणार आहे. ‘डेक्सा स्कॅन’मुळे रुग्णाला पॅथॉलॉजिकल चाचण्या करण्याची गरज भासणार नाही. शिवाय एक्स-रेच्या तुलनेत या उपकरणातून होणारा किरणोत्सर्ग देखील अत्यंत कमी स्वरूपात असतो.
रुग्णसेवेत यायला लागले नऊ महिने
मेडिकलमध्ये कार्यान्वित १५० कोटींच्या पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून ‘डेक्सा स्कॅन’ यंत्राची मागणी करण्यात आली होती. हे यंत्र फेब्रुवारी २०१७ मध्ये मेडिकलमध्ये उपलब्ध झाले. परंतु उपकरणाला आवश्यक असलेले साहित्य व तंत्रज्ञ उपलब्ध न झाल्याने तब्बल आठ महिने हे यंत्र डब्यात बंद होते. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.