नागपूर : 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'च्या माध्यमातून पुरांच्या धोक्याची पूर्वकल्पना कशी मिळेल, यावर देशातील संशोधकांचे काम सुरू आहे. आयआयटी- दिल्लीच्या संशोधकांनी 'डीपफ्लड' हे 'टूल' तयार केले असून, याच्या माध्यमातून पुरांचे 'मॅपिंग' करणे सहज शक्य आहे. सध्या याच्या 'प्रोटोटाइप'ला विकसित करण्यात आले असून, याचे निकाल चांगले आले आहेत. याला योग्य तंत्रज्ञान व शासकीय पुढाकाराची जोड मिळाली निश्चितच हे 'डीपफ्लड' लाखो -कोट्यवधींसाठी तारणहार ठरू शकते.
बिहार, बंगाल, आसाम, ओडिशा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यासह अनेक राज्ये दरवर्षी पुराच्या आपत्तीला तोंड देतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. नैसर्गिक आपत्ती येण्यापासून रोखता येत नाही. परंतु, त्यांचे दुष्परिणाम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टाळता येणे शक्य झाले आहे.
हीच बाब लक्षात ठेवून 'आयआयटी, दिल्ली'च्या सिव्हील अभियांत्रिकी विभागाने 'एआय' आधारित 'डीप फ्लड' हे टूल तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून शंभर किलोमीटरच्या परिसरातील पूर परिस्थितीचे एका मिनिटांत मूल्यांकन करता येणे शक्य आहे. अॅप सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक मानवेंद्र सहारिया आणि संशोधक निर्देश कुमार शर्मा यांनी विकसित केले आहे. 'इंडिया एआय अप्लिकेशन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह' अंतर्गत या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे हे विशेष.
मागील काही काळापासून विविध राज्यांमध्ये पुराचे प्रमाण वाढले असून, अगदी नागपूरसारख्या शहरातही पुराने थैमान घातल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी पूरपरिस्थितीमुळे कोट्यवधींचे नुकसान होते व हजारोंचे बळी जातात. अनेक वर्षांच्या संघर्षातून वसलेल्या कुटुंबांच्या हातचा घास कधी गंगामाई, तर कधी नागनदी ओढून घेऊन जाते. मात्र, पुराचा धोका अगोदर कळला तर अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवता येऊ शकेल.
उपग्रह, रडारच्या माध्यमातून होते 'मॅपिंग''डीप फ्लड' हे टूल 'एसएआर' (सिंथेटिक अपर्चर रडार) तंत्रज्ञानावर आधारित आहे. या माध्यमातून उपग्रह प्रतिमा पाठवल्या जातात. टूलच्या माध्यमातून त्याचे मॅपिंग करण्यात येते. त्या माध्यमातून पूरग्रस्त भागांची अचूक माहिती मिळणे शक्य होते. ढगाळ वातावरणात अनेकदा उपग्रहांच्या माध्यमातून नेमक्या प्रतिमा मिळण्यात अडचण जाते. शिवाय वनक्षेत्र, रात्रीदेखील अनेक आव्हाने असतात.मात्र, 'एसएआर'मुळे ढगांच्या पलीकडे, घनदाट जंगली भागात आणि रात्रीच्या वेळी प्रतिमा व 'रील टाइम' स्थिती जाणणे शक्य होते. या प्रतिमा मिळाल्यानंतर 'एआय'च्या माध्यमातून 'डीपफ्लड' विश्लेषण करून मॅपिंग करते व संबंधित भागात पुराचे पाणी किती वेळात पोहोचेल, याची माहिती मिळू शकते.
काय आहे डीपफ्लड
- अत्याधुनिक पूर मॅपिंग करणारे टूल
- जलद पूरग्रस्त पूरस्थिती मॅपिंग शक्य
- व्हिजन ट्रान्सफॉर्मर्स आणि सॅटेलाइट डेटाचा वापर
- रिअल-टाइम, स्वयंचलित पूरस्थिती शोधणे शक्य
- एसएआर डेटा आणि डीप लर्निंग मॉडेल्सचा वापर