मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्याचा निकाल २ जून रोजी
By Admin | Updated: May 27, 2015 03:01 IST2015-05-27T03:01:24+5:302015-05-27T03:01:24+5:30
नंदनवनच्या केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्याचा ...

मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्याचा निकाल २ जून रोजी
नागपूर : नंदनवनच्या केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्याचा बहुप्रतीक्षित निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी यांचे न्यायालय २ जून जाहीर करणार आहे.
कुणाल अनिल जयस्वाल, प्रदीप महादेव सहारे, श्रीकांत सारकर, उमेश मराठे, रामेश्वर सोनेकर आणि गीता मालधुरे, अशी या खटल्यातील आरोपींची नावे आहेत.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, मोनिकाच्या हत्याकांडाची घटना ११ मार्च २०११ रोजी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, दर्शन कॉलनी ते श्रीनगर दरम्यान रस्त्यावर घडली होती.
सरकारी पक्षानुसार कुणाल जयस्वाल हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. तो सावरगावचा रहिवासी असून घटनेच्या वेळी तो काटोलच्या सेंट पॉल हायस्कूलचा शिक्षक होता.कुणालचे केडीकेमध्ये शिकणाऱ्या आणि नंदनवनच्याच वसतिगृहात राहणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये बेबनाव निर्माण झाल्याने कुणाल हा आपला मित्र प्रदीप महादेव सहारे याला सोबत घेऊन २२ फेब्रुवारी २०११ रोजी केडीके कॉलेज येथे प्रेयसीला समजावण्यासाठी गेला होता. दोघे आमोरासमोर येऊनही ती काहीही न बोलता निघून गेली होती. त्यामुळे चिडून कुणालने आपल्या प्रेयसीला कायमचे संपविण्याचे ठरवले होते.
याच वसतिगृहात राहणारी अन्य एक मुलगी कुणालच्या ओळखीची होती. दोघीही एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी होत्या. मात्र ती कुणालच्या प्रेयसीच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून कुणालला मोबाईलवर कळवायची. दरम्यान कुणालने आपला मित्र प्रदीप याची माहिती देणाऱ्या मैत्रिणीसोबत ओळख करून दिली होती.
कुणालने प्रदीपला भाडोत्री गुंडांकडून आपल्या या प्रेयसीचा खून करण्यास सांगितले होते. मोमीनपुऱ्याच्या एका हॉटेलमध्ये खुनाचा कट रचण्यात आला होता. खुनासाठी एक लाखाची सुपारी देऊ करण्यात आली होती.
प्रत्यक्ष खुनाच्या एक दिवसाअगोदर कुणाल आणि प्रदीप हे नंदनवन येथील वसतिगृहानजीकच्या एका कॅफेत थांबले होते. मारेकऱ्यांना कुणालच्या प्रेयसीला तिच्याच मैत्रिणीच्या मार्फत दाखवण्यात आले होते.
घटनेच्या दिवशी कुणालची प्रेयसी वसतिगृहातून बाहेर पडल्याची माहिती तिच्या मैत्रिणीने कुणालला दिली. लागलीच मारेकऱ्यांनी मोटरसायकलींनी पाठलाग सुरू केला होता. ती कुणालची प्रेयसी नव्हती तर तिच्यासारखी दिसणारी निष्पाप मोनिका किरणापुरे होती. कॉलेजचा गणवेश घालून आणि स्कार्पने चेहरा झाकून होती. तिच्यावर तीक्ष्ण व धारदार शस्त्रांचे दहा घाव घालण्यात आले होते. त्यापैकी तीक्ष्ण व धारदार जांबिया तिच्या पाठीत भोसकण्यात आला होता. खून केल्यानंतर लागलीच सर्व आरोपी काटोल येथे पळून गेले होते. कुणालने बँकेतून १ लाख २० हजाराचे कर्ज घेऊन आरोपींना दिले होते.
२३ वर्षीय मोनिका ही अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला शिकत होती. ती रामटेकनजीकच्या नगरधन येथील रहिवासी होती.
या प्रकरणाचे तपास अधिकारी गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक माधव गिरी हे आहेत. या खटल्यात आतापर्यंत ३१ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. न्यायालयात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम तर आरोपींच्यावतीने अॅड. सुदीप जयस्वाल आणि अॅड. नितीन हिवसे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
आरोपपत्रात फरार यादवचा का नाही उल्लेख ?
मंगळवारी बचाव पक्षाने आपला युक्तिवाद पूर्ण केला. या प्रकरणातील फरार आरोपी राजू यादव याचा आरोपपत्रात उल्लेख करण्यात आलेला नाही. खून यादवने केला आणि या आरोपींना खुनात गोवण्यात आले, असा युक्तिवाद अॅड. सुदीप जयस्वाल यांनी केला.