दोन वर्षांपासून पैशांची चणचण
By Admin | Updated: May 11, 2014 01:24 IST2014-05-11T01:24:05+5:302014-05-11T01:24:05+5:30
वासनकर समूहाचे पतन कसे झाले, याबद्दल अनेक गुंतवणूकदार चर्चा करीत होते़ वासनकरांना पैशाची चणचण दोन वर्षांपासून जाणवत होती

दोन वर्षांपासून पैशांची चणचण
वासनकर समूहाचे पतन : लोकमतने उघडकीस आणला घोटाळा
नागपूर : वासनकर समूहाचे पतन कसे झाले, याबद्दल अनेक गुंतवणूकदार चर्चा करीत होते़ वासनकरांना पैशाची चणचण दोन वर्षांपासून जाणवत होती आणि त्यांनी गुंतवणूकदारांना टाळणे सुरू केले होते़, अशी माहिती आहे़ याचबरोबर वासनकरांनी ठेवीदारांना गप्प करण्यासाठी गुंडांची मदत घेतल्याचीही चर्चा होती़ लोकमतने वासनकरांचा घोटाळा पाच महिन्यापूर्वीच उघडकीस आणला होता, त्याबद्दल लोकमतचे अभिनंदन होत होते़ गेल्या तीन वर्षात नागपूरमध्ये उघडकीस आलेला हा चौथा गुंतवणूक घोटाळा आहे़ तीन वर्षांपूर्वी प्रमोद अग्रवाल याच्या महादेव लॅण्ड डेव्हलपर्सने जनतेला अंदाजे ५०० कोटी रुपयाने फसविल्याचे प्रकरण गाजले होते़ गेल्यावर्षी समीर जोशीच्या श्रीसूर्या समूहाने ठेवीदारांना २५० कोटी रुपयांची टोपी घातल्याचे उघडकीस आले होते़ आता वासनकरांवर पोलीस कारवाई होत आहे़ नागपूरच्या इतिहासातील हा शेवटचा घोटाळा ठरणार काय, हे आता काळच सांगेल़ सोने, रोकड अन् पासपोर्ट जप्त गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांच्या पाच वेगवेगळ्या पथकांनी वासनकरसह अन्य आरोपींची निवासस्थाने, कार्यालय, वासनकरचे फार्म हाऊस आदी ठिकाणी छापे घालून तेथून लाखोंची रोकड, २५ तोळे सोने, आरोपींचे पासपोर्ट, कोट्यवधींच्या मालमत्तेची कागदपत्रे, चेकबूक, पासबूक, गुंतवणूकदारांच्या याद्या आणि या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी किमान ४ ते ५ दिवस लागतील, असे पोलीस सांगतात. या प्रकरणाचा मुख्य आरोपी प्रशांत वासनकर किंवा कोणत्याच आरोपीला वृत्त लिहिस्तोवर अटक झालेली नाही. मात्र, सर्वच आरोपींवर आम्ही नजर ठेवून असल्याचे पोलीस सांगतात. पोलीस म्हणतात, तक्रारी द्या ! वासनकरने किती ठेवीदारांचे किती रुपये हडपले, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, ठेवीदारांची संख्या ४ हजारांपेक्षा जास्त आणि रक्कम १५०० कोटींपेक्षा जास्त असल्याची जोरदार चर्चा आहे. ठेवीदारांची संख्या आणि वासनकरने हडपलेली रक्कम किती आहे, ते तक्रारीवरूनच स्पष्ट होईल. त्यामुळे ठेवीदारांनी कोणत्याही दडपणाला किंवा आमिषाला बळी न पडता पोलिसांकडे तक्रारी द्याव्या, असे आवाहन गुन्हेशाखेच्या पोलीस अधिका-यांनी केले आहे. (प्रतिनिधी) हे आहेत आरोपी गुन्हेशाखेने या फसवणूकीत प्रशांत जयदेव वासनकर (मुख्य सूत्रधार) याच्यासोबतच त्याच्या वासनकर समूहात असलेली त्याची पत्नी भाग्यश्री प्रशांत वासनकर व विनय जयदेव वासनकर, मैथिली विनय वासनकर, अभिजीत जयवंत चौधरी आणि कुमुद चौधरी तसेच त्यांच्याकडे कर्मचारी म्हणून काम करणारे चंद्रकांत, देवदत्त करडले आणि श्री खापरे या ९ जणांचा समावेश असल्याचा निष्कर्ष काढून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.