नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात मध्यम ते जाेरदार पावसाची हजेरी
By निशांत वानखेडे | Updated: September 24, 2024 18:55 IST2024-09-24T18:55:09+5:302024-09-24T18:55:59+5:30
वेधशाळेचा अंदाज खरा ठरला : बहुतेक जिल्ह्यात सरी, तापमान घसरले

Moderate to heavy rains in most districts of Vidarbha including Nagpur
नागपूर : हवामान विभागाच्या अंदाजाला पहिल्या दिवशी हुलकावणी देणारा पाऊस दुसऱ्या दिवशी मात्र बरसला. साेमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारीही कायम हाेता. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात मध्यम ते जाेरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले तापमान पावसामुळे माेठ्या फरकाने खाली घसरले व उकाड्यापासून दिलासा मिळाला.
हवामान विभागाने २६ सप्टेंबरपर्यंत विदर्भात जाेरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र व इतर वातावरणीय परिस्थितीमुळे मध्य भारतासह इतरही भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. अंदाज असतानाही २३ सप्टेंबरराेजी दिवसभर पावसाचा थेंबही बरसला नाही. उलट वाढलेल्या तापमानामुळे प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. मध्यरात्री मात्र वातावरण बदलले आणि पावसाला सुरुवात झाली. २४ सप्टेंबरच्या सकाळी आकाश काळ्याभाेर ढगांनी वेढले हाेते. पावसाचा जाेर दुपारी ३ पर्यंत कायम हाेता. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिराेली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यात पावसाचा जाेर अधिक हाेता.
नागपुरात सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत २४ तासात २३ मि.मी. पावसाची नाेंद झाली. भंडाऱ्यात सर्वाधिक ३९ मि.मी. पाऊस झाला. चंद्रपूरला सकाळपर्यंत बरसलेला पाऊस नंतर शांत हाेता. इतरही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरींची हजेरी लागली.
२५ ला अलर्ट
२४ ते २६ सप्टेंबर या काळात विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात मध्यम ते जाेरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामध्यम २५ सप्टेंबर राेजी अतिजाेरदार पावसाची शक्यताही वेधशाळेने वर्तविली आहे.
हा परतीचा पाऊस नाही
दरम्यान २३ सप्टेंबरपासून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून २४ सप्टेंबर राेजी राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणाच्या काही भागातून काढता पाय घेतला. मान्सून परतीची लाईन फिराेजपूर, सिरसा, माउंट अबू, चुरू, अजमेर, दीसा, सुरेंद्रनगर, जुनागड या भागातून गेली व ती हळूहळू पुढे सरकत आहे. विदर्भ व मध्य भारतात सध्या सुरू असलेला पाऊस हा परतीचा पाऊस नाही, असे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. विदर्भातून ५ ते १० सप्टेंबरदरम्यान मान्सून निघण्याची व या काळात मध्यम पाऊस हाेण्याचीही शक्यता आहे. १५ ऑक्टाेबरपर्यंत मान्सून देशातून निघून जाईल, असा अंदाज आहे.