राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधात मनसेचे निषेध आंदोलन
By योगेश पांडे | Updated: November 21, 2022 13:45 IST2022-11-21T13:41:25+5:302022-11-21T13:45:35+5:30
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे नागपुरात पडसाद

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधात मनसेचे निषेध आंदोलन
नागपूर :छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. महालात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन झाले.
सुधांशू त्रिवेदी यांनी आपल्या भाषणामध्ये शिवाजी महाराज यांनी औरंगजेब यांना ५ वेळा पत्र लिहून माफी मागितली असे वक्तव्य केले होते. त्याविरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी दोघांच्याही फोटोला काळे फासण्यात आले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीतर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व त्रिवेदी यांच्याविरोधात आज आंदोलन करण्यात येणार आहे.
काय म्हणाले होते भगतसिंह कोश्यारी?
'आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण ? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,' असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले होते.
सुधांशू त्रिवेदींचं वादग्रस्त विधान
भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दिल्लीत आक्षेपार्ह वक्तव्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रे लिहिली होती. त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहीत असत, असे सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटले होते.