आमदाराच्या वाहनाची कारला धडक, महिला वकील गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 08:43 IST2024-04-11T08:43:30+5:302024-04-11T08:43:42+5:30
आमदारांच्या कारने धडक दिल्यावर ॲड. मनीषा राऊत यांची कार रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली

आमदाराच्या वाहनाची कारला धडक, महिला वकील गंभीर जखमी
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान (जि. नागपूर) : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या कार्यक्रमाला येत असलेल्या रामटेकचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जाेरात धडक दिली. यात महिला वकील गंभीर जखमी झाली असून, दाेन्ही कारचे चालक किरकाेळ जखमी झाले. विशेष म्हणजे, त्या कारमध्ये आ. आशिष जयस्वाल नव्हते. ही घटना नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरडी फाटा परिसरात बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
आमदारांच्या कारने धडक दिल्यावर ॲड. मनीषा राऊत यांची कार रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली. त्यातून जखमींना बाहेर काढण्यात आले. ॲड. राऊत (४५, रा. भंडारा) असे गंभीर जखमी महिलेचे नाव असून, त्या रामटेक शहरातील दिवाणी व फाैजदारी न्यायालयात सरकारी अधिवक्ता आहेत.