मध्य प्रदेशातील अपघाताचा धसका
By Admin | Updated: August 7, 2015 03:02 IST2015-08-07T03:02:17+5:302015-08-07T03:02:17+5:30
मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे अपघाताचा धसका मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे.

मध्य प्रदेशातील अपघाताचा धसका
वेगावर नियंत्रण : नदीवरील बांधांची पाहणी, पुलांवर वॉचमनची ड्युटी
नागपूर : मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे अपघाताचा धसका मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे. रेल्वे रुळांना प्रभावित करणाऱ्या नदीवरील बांधांची मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे पाहणी करण्यात येत आहे. अभियांत्रिकी आणि सिंचन विभागाचे अधिकारी या बांधांची माहिती घेत असून राज्य शासनालाही बांधावरून पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याबाबत कळविण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सर्व रेल्वे रुळावर पावसाळ्यात गस्त वाढविण्यात आली आहे. पहिल्यांदाच रेल्वे पुलांवर वॉचमनची ड्युटी लावण्यात आली आहे. रेल्वे येण्यापूर्वी पुलाकडील भागात पाऊस पडल्याची सूचना हे वॉचमन देणार आहेत. सूचना मिळताच रेल्वेगाड्यांना थांबविण्यात येईल किंवा कमी वेगाने गाड्या चालविण्यात येतील. अशा प्रकारची घटना सिंदी-तुळजापूर रेल्वे मार्गावर १९ जुलै २०१३ रोजी घडली होती. रुळाखालील माती वाहून गेल्यामुळे रेल्वे रुळ हवेत लोंबले होते. या घटनेत ४० मीटर रेल्वे रुळाखालील माती वाहून गेली होती. परंतु या घटनेची पूर्वसूचना मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. दरम्यान पावसामुळे रेल्वेगाड्या कमी वेगाने चालविण्यात येणार असून संवेदनशील भागात ९० ऐवजी ७५ किलोमीटर प्रतितास वेग ठरवून देण्यात आला आहे. तसेच रेल्वे रुळावर पाणी जमा झाल्यास ५० किलोमीटरच्या अधिक वेगाने गाड्या चालविण्यात येणार नसल्याची माहिती वरिष्ठ विभागीय अभियंता डी. आर. टेंभुर्णे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)