अल्पवयीन मुलाकडून वडिलांची हत्या; पत्नीने पुरावे नष्ट करण्यासाठी केली मदत
By योगेश पांडे | Updated: January 20, 2025 17:26 IST2025-01-20T17:25:23+5:302025-01-20T17:26:56+5:30
दारूच्या व्यसनाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल : मृतकाच्या पत्नीने पुरावे नष्ट करण्यासाठी केली मदत

Minor son kills father; Wife helps him destroy evidence
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वडिलांच्या दारूच्या व्यसनाला व त्यानंतर होणाऱ्या छळवणूकीला कंटाळून एका अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलले. त्याने वडिलांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याच्या आईने पुरावे नष्ट करण्यासाठी त्याची मदत केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
मुकेश शंकरराव शेंडे (५७, इंगोलेनगर, हुडकेश्वर) असे मृतकाचे नाव आहे. ते ताराचंद भोंगाडे यांच्या घरी पत्नी उर्मिला व १७ वर्षीय मुलासह भाड्याने राहत होते. त्यांचा एक मुलगा बाहेरगावी नोकरी करतो. शेंडे हे एका हार्डवेअरच्या दुकानात कामाला होते व त्यांना दारूचे व्यसन होते. त्यातूनच ते पत्नी तसेच मुलाला शिवीगाळ करून मारहाण करायचे. त्यांच्या या वागणुकीला दोघेही कंटाळले होते. १९ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता शेंडे दारू पिऊन घरी गेले व नेहमीप्रमाणे त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते परत दारू पिण्यासाठी बाहेर गेले व रात्री दहा वाजता परतले. नशेत त्यांनी पत्नी व मुलाला परत शिवीगाळ सुरू केली. तेव्हा मायलेक जेवण करत होते. त्यांच्या या वागण्याला अल्पवयीन मुलाने विरोध केला असता शेंडे संतापले. त्यांच्यात भांडण झाले व झटापट सुरू झाली. त्यात अल्पवयीन मुलाने शेंडे यांना गादीवरून खाली ढकलले. खाली पडल्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त निघायला लागले. आता वडील काय करतील या भितीपोटी अल्पवयीन मुलाने थेट टॉवेल उचलला व गळा आवळत शेंडे यांची हत्या केली. हा प्रकार पाहून शेंडे यांची पत्नी हादरली. मात्र आता मुलाला वाचविणे आवश्यक आहे या विचारातून त्यांनी पुरावा नष्ट करायला त्याची मदत केली. त्यांनी शेंडे यांचा मृतदेह पोत्यात भरला. तसेच घटनास्थळावरील रक्ताचे डाग फिनाईलने पुसले. शेंडे यांचे चुलतभाऊ मंगेश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
दहावीत असतानादेखील करायचा काम
आरोपी अल्पवयीन मुलगा हा दहावीत शिकतो. तो अभ्यासात चांगला असला तरी घरची परिस्थिती बेताचीच असल्याने तो सुटीच्या दिवशी कामावर जायचा. उन्हाळ्याच्या सुटीतदेखील तो दुकानांमध्ये काम करून घरखर्चात मदत करत होता. वडील दारूच्या व्यसनापोटी घराकडे दुर्लक्ष करत आहेत हे पाहून तो नेहमी चिडायचा.
नदीत फेकणार होते मृतदेह
हत्येनंतर मायलेकाने शेंडे यांचा मृतदेह पांढऱ्या रंगाच्या पोत्यात भरला व तो दोन्ही बाजूंनी शिवला. मृतदेह नदी किंवा नाल्यात फेकण्याचे ठरविले. बंटीने मदतीसाठी एका जवळच्या मित्राला फोन केला. मात्र मित्राने त्याची मदत न करता त्याला पोलिसांत जाऊन सर्व प्रकार कबूल करण्याचा सल्ला दिला. त्याच्या सल्लावरून मायलेकांनी हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठले.