विधानभवनात मंत्र्यांची दालने अपुरी, अडीज कोटी खर्च करून १६ दालने उभारण्याची मंजुरी
By आनंद डेकाटे | Updated: November 8, 2025 19:36 IST2025-11-08T19:35:12+5:302025-11-08T19:36:28+5:30
Nagpur : विधान परिषद असलेल्या इमारतीच्या मागच्या भागातील मोकळ्या जागेवर ही तात्पुरती दालने तयार करण्यात येणार आहे. या दालनात सर्व सुविधा असणार असून मंत्र्यांच्यी पीएच्या रहाण्याचीही व्यवस्था असेल.

Ministers' chambers in Vidhan Bhavan are insufficient, approval to build 16 chambers at a cost of Rs. 2.5 crore
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ८ डिसेंबरपासून सुरू होणार असून २८ नोव्हेंबरला सचिवालय नागपुरात येणार आहे. महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्र्यांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत विधान भवनाच्या दोन्ही इमारतींमध्ये दालने अपुरी पडत असल्याने मंत्र्यांसाठी विधानभवन परिसरात १६ दालने तयार करण्यात येणार आहे. ही दालने तात्पुरत्या स्वरूपातील असतील.
विधान परिषद असलेल्या इमारतीच्या मागच्या भागातील मोकळ्या जागेवर ही तात्पुरती दालने तयार करण्यात येणार आहे. या दालनात सर्व सुविधा असणार असून मंत्र्यांच्यी पीएच्या रहाण्याचीही व्यवस्था असेल. मुख्यमंत्री आणि मंत्री याच भागाकडून विधिमंडळात प्रवेश करतात. यापूर्वी येथे तात्पुरत्या स्वरूपात कॅबिनेट हॉल तयार करण्यात आला होता हे विशेष. या तात्पुरत्या स्वरूपाच्या दालनासाठी २.५० कोटी खर्चाचा प्रस्ताव असून विधिमंडळ सचिवालयाकडून त्याला मंजुरीसुद्धा देण्यात आल्याची माहिती आहे. महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री व राज्यमंत्र्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथे दालनांची संख्या अपुरी पडत आहे. यापूर्वी सहा मंत्र्यांची व्यवस्था नवीन इमारतीत करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही दालनांची संख्या अपुरी पडत असल्याचे दिसते. त्यामुळे मंत्री व त्यांच्या पीएंसाठी तात्पुरत्या स्वरूरात हे १६ दालन करण्यात येणार आहे.
"अधिवेशनासाठी विधानभवनात मंत्र्यांसाठी १६ तात्पुरती दालने तयार केली जाणार आहे. ही दालने नट बोल्ट लावून तात्पुरत्या स्वरूपाची राहतील. ती नंतर काढण्यात येईल."
- जनार्दन भानुसे, अधीक्षक अभियंता, नागपूर विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग