"१९९५ पासून गोव्यात काम केलंय; पर्रीकर असतानाही इतर पक्षांची मदत लागायची, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:19 IST2022-03-17T13:18:16+5:302022-03-17T13:19:43+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. अनुकूल परिस्थिती असतानाही गोव्यात इतक्या जागा आम्हाला मिळाल्या नव्हत्या : नितीन गडकरी

"१९९५ पासून गोव्यात काम केलंय; पर्रीकर असतानाही इतर पक्षांची मदत लागायची, पण..."
"पाच राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या अतिशय महत्त्वाच्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नड्डा यांच्या नेतृत्वाखाली मोठं यश मिळालंय ते भाजपचा विश्वास आणि आत्मविश्वास वाढवणारी घटना आहे. पाच राज्यांमध्ये निवडणुका कठीण आहेत असं लोक चर्चा करत होते. प्रामुख्यानं गोव्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर १९९५ पासून मी काम करून आलोय. अनुकूल परिस्थिती असतानाही इतक्या जागा आम्हाला मिळाल्या नव्हत्या. मनोहर पर्रीकर असतानाही आम्हाला दरवेळी इतर लोकांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करावा लागत होता. परंतु यावेळी गोव्याच्या जनतेनं भाजपला पूर्ण बहुमत दिलं," असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. भाजपच्या विजयानंतर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
"यावेळी निवडणुकीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. प्रमोद सावंतही मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते. या दोघांच्या नेतृत्वाखाली गोव्यात अभूतपूर्व यश मिळालं. गोव्याच्या निवडणुकीत अनेक पक्ष उतरले होते. भाजपला अपशकुन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं कंबर कसली होती. रोज वृत्तपत्रांना मुलाखती देऊन भाजपचा पराभव कसा करता येईल याचा प्रयत्न करत होते. परंतु गोव्याच्या जनतेनं त्यांचं काय स्थान आहे हे सिद्ध केलं," असं म्हणत गडकरींनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला टोला लगावला.
उत्तराखंड, उत्तर प्रदेशातही मोठं यश
"उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातही यश मिळालं. योगी आदित्यनाथ यांनी माझी भेट घेतली होती. ज्या प्रकारे उत्तर प्रदेशात मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रानं आणि उत्तर प्रदेश सरकारनं काम केलं असं त्यांनी सांगितलं. जात, पंथ, पक्ष याच्या वर जाऊन आपल्या भविष्यासाठी भाजपवर विश्वास दाखवला हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुरातही आपला भक्कम पाया उभा राहीला," असंही त्यांनी नमूद केलं.