केंद्राकडे असलेला इम्पिरिकल डेटा ९८ टक्के निर्दोष : छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 14:49 IST2021-12-17T13:52:39+5:302021-12-17T14:49:43+5:30
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. केंद्राला डेटा द्यायचा नव्हता असा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

केंद्राकडे असलेला इम्पिरिकल डेटा ९८ टक्के निर्दोष : छगन भुजबळ
नागपूर : ओबीसींचा इम्पिरिकल डेटा असतानाही केंद्राने तो दिला नाही. केंद्र सरकारकडून ओबीसींची कोंडी केली जात आहे. केंद्राकडे असलेला इम्पिरिकल डेटा ९८ टक्के निर्दोष आहे, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
आम्ही ओबीसींचा डेटा केंद्राकडे मागितला पण केंद्राला डेटा द्यायचा नव्हता, असा आरोप करत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा असतानाही केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा गोळा केला नाही, मग भाजप नेत्यांनी कसली मागणी केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ओबीसी जनगणनेचा डेटा आम्हाला द्या अशी मागणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात केली. त्यावर हा डेटा सदोष असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं. मग, हा डेटा आम्हाला द्या आम्ही दुरुस्त करून घेतो असं म्हटलं. पण केंद्राला आमचा डेटा द्यायचा नव्हता, त्यामुळे आम्ही ओबीसींची जनगणना केली नसल्याचे केंद्राने म्हटले, असे भुजबळ म्हणाले.
आम्हाला केंद्र सरकार तो डेटा देत नाही. आमच्याकडे डेटा नाही असे केंद्र सरकार म्हणत आहे, हे साफ खोट आहे. केंद्र सरकार ओबीसींची कोंडी करत आहे. आमच्या मंत्र्याविरुद्ध खोट्या केसेस सुरू आहेत. राज्य सरकार ओबीसींच्या विरोधात असल्याचे चित्र केंद्राकडून उभं केलं जात आहे. कोरोनामुळे दोन वर्षात डेटा गोळा करता आला नाही. आता कोरोनाचा धोका कमी झाला आहे, आम्ही डेटा गोळा करण्याबाबचे काम करतो. आम्हाला वेळ देणे गरजेचे असल्याचेही भुजबळ यावेळी म्हणाले.