लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी महामेट्रोच्या ऑरेंज लाईन मार्गिकेवरील सीताबर्डी इंटरचेंज ते जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनदरम्यान बुधवारी मेट्रोने प्रवास केला. नागपूर मेट्रो रेल्वेचा प्रवास अत्यंत आरामदायक व पर्यावरणपूरक असून नागपूरकरांनी वापर करावा, मत अमितेशकुमार यांनी व्यक्त केले.
उत्तम दर्जाची सार्वजनिक वाहतूक सेवा नागपूर शहरात उपलब्ध असून, पर्यावरण व इतर सोईसुविधाच्या दृष्टीने नक्कीच उपयुक्त आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या ऑरेंज आणि अॅक्वा लाईनवर दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू असून नागरिक वापर करीत आहे. शंकरनगर चौक आणि रचना रिंग रोड जंक्शन बुधवारपासून नागरिकांच्या सेवेत सुरू झाले आहेत. महामेट्रोतर्फे नॉन मेट्रो परिसरात कनेक्टीव्हीटी वाढवली जात असून ही अतिशय चांगली बाब आहे. नागरिकांनी स्वत:चे वाहन शक्य असेल तेवढे कमी वापरून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. मेट्रोच्या स्वरूपात अत्यंत चांगली सुविधा शहरातील नागरिकांना उपलब्ध असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मेट्रोचा उपयोग करावा आणि वाहतुकीच्या समस्येवर मात करण्यासाठी योग्य मार्ग निवडावा, असे आवाहन अमितेशकुमार यांनी नागरिकांना केले.