मेट्रो रेल्वे पकडणार गती
By Admin | Updated: March 14, 2015 02:37 IST2015-03-14T02:37:59+5:302015-03-14T02:37:59+5:30
नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड ( एनएमआरसीएल ) च्या दिल्ली येथे शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

मेट्रो रेल्वे पकडणार गती
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड ( एनएमआरसीएल ) च्या दिल्ली येथे शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे.
बैठकीत एनएमआरसीएल संदर्भातील कंपनी कायद्यांतर्गत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कंपनीतर्फे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी कंपनीचे प्रबंध संचालक (एमडी) बृजेश दीक्षित यांना नागपूर विमानतळ ते खापरीपर्यंतचे काम प्राधान्याने सुरू करण्याचे सर्वांधिकार देण्यात आले आहेत. बैठकीला एनएमआरसीएलच्या १० पैकी ९ सदस्य उपस्थित होते. यात बृजेश दीक्षित, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने आदींचा समावेश होता. परंतु १८ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने राज्याचे प्रधान सचिव (वित्त) सुधीर कुमार श्रीवास्तव यांना उपस्थित राहता आले नाही. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती बृजेश दीक्षित यांनी लोकमतला दिली.
फ्रान्सचे पथक येणार
फ्रान्सची वित्तीय संस्था (एएफसी) चे पथक २६ ते २८ मार्च दरम्यान नागपूर दौऱ्यावर येत आहे. या संस्थेने प्रकल्पासाठी १५०० कोटींचे कर्ज देण्याला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. यात वाढ व्हावी, यासाठी मेट्रो रेल्वे कार्पोरेशन प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले.